दोन योजनांद्वारे ३ लाख कोटींच्या गंगाजळीचा टप्पा

नवी दिल्ली : सेवानिवृत्तिवेतनासाठी स्थापित नियामक यंत्रणा ‘पीएफआरडीए’ने राष्ट्रीय पेन्शनप्रणाली (एनपीएस) या प्रमुख योजनेसह, अटल पेन्शन योजनेतील खातेधारक हे सध्या २.६५ कोटींवरून येत्या मार्चअखेपर्यंत २.७२ कोटींवर जाणे अपेक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे.

अटल पेन्शन योजनेत सध्या १.४५ कोटी खातेधारक आहेत, तर ‘एनपीएस’ खातेधारकांची संख्या १.२० कोटी अशी आहे. दोन्ही योजनांमधून प्राधिकरणाकडे आलेल्या गंगाजळीने (एयूएम) नुकतीच तीन लाख कोटी रुपयांपुढे मजल मारली आहे. गेल्या वर्षांच्या तुलनेत गंगाजळीत जवळपास ४०-४५ टक्के वाढ झाली आहे, असे पीएफआरडीएचे अध्यक्ष हेमंत कॉन्ट्रॅक्टर यांनी सांगितले.

चालू वर्षांतील प्रतिसाद तर उत्साहवर्धकच असून, सर्वाधिक नवीन खातेधारक जोडले जाण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी आणि मार्च हे महत्त्वाचे महिने आहेत. ते पाहता सध्याच्या २.६५ कोटींवरून खातेधारकांची संख्या मार्चअखेर २.७२ कोटींवर सहज जाईल, असा विश्वास कॉन्ट्रॅक्टर यांनी व्यक्त केला.

यंदाच्या हंगामी अर्थसंकल्पातून जाहीर झालेली  ‘प्रधान मंत्री श्रमयोगी मानधन’ या नवीन पेन्शन योजनेतून असंघटित क्षेत्रातील कामगारांकडून दरमहा १०० रुपये (वयाच्या साठीपर्यंत) योगदानातून, निवृत्तिपश्चात दरमहा ३,००० रुपये त्यांना पेन्शनरूपात दिले जाणार आहेत.

अटल पेन्शन योजनेलाच समांतर असलेल्या या योजनेतून निवृत्तिपश्चात निश्चित पेन्शनची हमी दिली गेली आहे. तथापि खातेधारकांच्या खात्यात  केंद्र सरकारकडून ५० टक्क्यांचे योगदान हे तिचे अटल पेन्शन योजनेच्या तुलनेत वेगळेपण आहे.