हिरे व्यापारी नीरव मोदी याचा ११,४०० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर, पंजाब नॅशनल बँकेने आठवडाभरात आपल्या देशभरातील शाखांमधून तब्बल १,४१५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

बँकेच्या एका शाखेत एकाच जबाबदारी घोटाळ्यात सहभागी असलेले विशिष्ट कर्मचारी दीर्घावधीपासून काम करीत होते आणि त्यातून हा गैरव्यवहार बिनबोभाट सुरू राहिला, असा पंजाब नॅशनल बँकेबाबत आरोप होता. बँकेच्या मनुष्यबळ व्यवस्थापनविषयक धोरण आणि प्रथेचेही हे उल्लंघन असल्याचे म् हटले गेले आहे.

या पाश्र्वभूमीवर, १९ फेब्रुवारी २०१८ पासून बँकेने २५७ कनिष्ठ कर्मचारी, ४३७ लिपिक आणि ७२१ अधिकारी (एकूण १,४१५) यांच्या बदल्या केल्या आहेत. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे १९ फेब्रुवारीलाच बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापनाला केंद्रीय दक्षता आयोगाने बैठकीसाठी बोलावले होते. नीरव मोदी घोटाळ्याप्रकरणी दोषी आढळलेल्या एकूण १८ कर्मचारी-अधिकाऱ्यांवर बँक व्यवस्थापनाकडून निलंबनाची कारवाई आजवर झाली आहे,

मात्र बदल्यांचे हे पाऊल बँकेच्या अंतर्गत बदल्यांच्या धोरणानुसार टाकण्यात आल्याचे पीएनबीने स्पष्ट केले आहे. घोटाळा उघडकीस आल्यामुळे हा बदल करण्यात आला नसल्याचेही तिने नमूद केले आहे. तथापि एकूण बदल्यांचे प्रमाण हे १८ हजाराच्या घरात जाणारे असल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे बँकेने म्हटले आहे.