देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या आठ महत्त्वपूर्ण उद्योग क्षेत्राच्या उत्पादन कामगिरीत सलग सहाव्या महिन्यांत आकुंचन सुरूच राहिले असून, ऑगस्टमध्ये ते मागील वर्षांच्या तुलनेत आणखी ८.५ टक्क्य़ांनी ऱ्हास पावल्याचे सरकारकडून बुधवारी प्रसिद्ध झालेल्या अधिकृत आकडेवारीने स्पष्ट केले.

वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सरलेल्या ऑगस्टमध्ये पोलाद, सीमेंट व रिफायनरी उत्पादनांमध्ये मोठी घसरण दिसून आली. विशेष म्हणजे गतवर्षी ऑगस्ट २०१९ मध्ये आठ मुख्य उद्योग क्षेत्रांचे उत्पादन ०.२ टक्के असे आक्रसलेलेच होते. यंदाच्या ऑगस्टची कामगिरी ही त्या मुळात खराब कामगिरीशी तुलना करून सादर केली गेली आहे.

कोळसा आणि खत निर्मिती या उद्योग क्षेत्रांचा अपवाद केल्यास, खनिज तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, पोलाद, सीमेंट आणि वीजनिर्मिती अशा अन्य महत्त्वाच्या उद्योगांच्या उत्पादन कामगिरीतील अधोगती उत्तरोत्तर वाढतच आहे.

विद्यमान २०२०-२१ आर्थिक वर्षांच्या एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत या गाभा उद्योगांच्या उत्पादन कामगिरीने १७.८ टक्क्य़ांची अधोगती दर्शविली आहे. गेल्या वर्षी याच पाच महिन्यांत २.५ टक्के वृद्धीदर नोंदविला गेला होता.