आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीतील वित्तीय निष्कर्षांच्या गुरुवारपासून सुरू होणाऱ्या हंगामाची प्रतीक्षा करत गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारातील व्यवहारांत सावध पवित्रा घेतला. सेन्सेक्स तसेच निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांत परिणामी नाममात्र स्वरूपाची हालचाल नोंदली गेली.
अवघ्या ७.०४ अंशवाढीसह सेन्सेक्स २७,८१५.१८ वर पोहोचला. त्याने ११ महिन्यांचा नवा उच्चांक सलग तिसऱ्या सत्रात नोंदविला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकात १.५५ अंश घसरण होत निर्देशांक ८,५१९.५० वर राहिला. यापूर्वीच्या दोन व्यवहारांत सेन्सेक्समध्ये एकूण ६८१.२४ अंश वाढ झाली आहे.
मेमधील वाढलेल्या १.२ टक्के औद्योगिक उत्पादन दराकडे दुर्लक्ष करत गुंतवणूकदारांनी उलट जूनमध्ये वाढलेल्या ५.७७ टक्के महागाईबाबत बाजारात व्यवहार करताना चिंता व्यक्त केली. यामुळे एकूण अस्थिरतेच्या वातावरणात अखेर सेन्सेक्सने किरकोळ वाढ तर निफ्टीने नाममात्र घसरण नोंदविली.
सेन्सेक्समधील १३ समभागांचे मूल्य वाढले. तर क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये पोलाद १.८३ टक्के वाढीसह सर्वात पुढे राहिला. मुंबई शेअर बाजारातील स्मॉल व मिड कॅप निर्देशांकांमध्ये मात्र अनुक्रमे ०.८२ व ०.५५ अंश घसरण झाली.

टीसीएस-इन्फोसिसच्या निकालांबाबत उत्कंठा..
ल्ल माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसचे तिमाही निकाल गुरुवारी तर इन्फोसिसचे शुक्रवारी जाहीर होणार आहेत. ‘ब्रेग्झिट’च्या पाश्र्वभूमीवर या निकालांबाबत बाजारात प्रचंड उत्सुकता आहे.

रुपया महिन्याच्या उच्चांकावर
ल्ल एकाच व्यवहारात १३ पैशांची उसळी घेत रुपयाचे विनिमय मूल्य बुधवारी डॉलरच्या तुलनेत महिन्याच्या वरच्या टप्प्यावर पोहोचले. स्थानिक चलन ६७.०५ पर्यंत भक्कम झाले. मंगळवारच्या ६७.१८ या बंद स्तरानंतर रुपया बुधवारी सुरुवातीलाच ६७.१० अशा भक्कम स्थानावर होता. सत्रात तो ६७.०२ पर्यंत झेपावला. दिवसअखेर बंद झालेला रुपयाचा ६७.०५ हा १० जूननंतरचा सर्वोच्च स्तर आहे.