एटीएम यंत्रांमधून ग्राहकांना बनावट नोटा मिळाल्याचे क्वचितच काही ठिकाणी आढळले असून, असल्या अपवादात्मक प्रकरणी चिंतेचे काहीच नाही, अशी निर्धास्ततेची ग्वाही देणारी प्रतिक्रिया रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर आर. गांधी यांनी गुरुवारी येथे व्यक्त केली. तरी बँकांकडून एटीएमच्या रोकड व्यवस्थापनाचे काम त्रयस्थ कंपनीकडे सोपविण्यासंबंधी असलेल्या नियमावलीचा पुनर्वेध आपण घेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

देशातील सध्याच्या सुमारे २ लाख एटीएमपैकी किती एटीएममधून अशा बनावट नोटा सापडल्या? एखाद-दुसऱ्या प्रसंगाचा इतका प्रमाणाबाहेर बाऊ केला जाऊ नये. गंभीर चिंतेचे कोणतेच कारण आपल्याला दिसत नाही, अशा शब्दांत गांधी यांनी पत्रकारांच्या या संबंधीच्या प्रश्नावर प्रतिक्रिया व्यक्त केली. त्रयस्थ रोकड व्यवस्थापनासंबंधाने काही बदल करावयाचा झाला तर तो आपण निश्चितच करू, अशी पुस्तीही त्यांनी पुढे जोडली. ‘ग्लोबललॉ’ या विधिविषयक परिषदेचे प्रमुख अतिथी म्हणून गांधी उपस्थित होते.

आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँकेच्या काही एटीएम यंत्रांमधून मुलांकडून खेळात वापरल्या जाणाऱ्या खोटय़ा नोटा ग्राहकांना सापडल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यासंबंधी पत्रकारांनी छेडले असता, ‘सर्वच एटीएममधून बनावट नोटा वितरित केल्या जात नाहीत. ही सार्वत्रिक समस्या असल्याचे दाखवू नका,’ असा सल्लावजा त्रागा गांधी यांनी व्यक्त केला. लोकांनीही त्यांच्याकडे असलेल्या नोटांच्या वैधतेची नियमितपणे खात्री करून घ्यायला हवी, असे आवाहनही त्यांनी केले.