भाडेवाढ नसलेल्या रेल्वे अर्थसंकल्पाविषयी दिवसभर स्थिर प्रतिसाद देणाऱ्या भांडवली बाजारात या क्षेत्राशी संबंधित समभागांमध्ये संमिश्र मूल्य हालचाल दिसून आली. असे असले तरी यादीत मूल्य घसरलेल्या कंपन्यांची संख्याच अधिक होती. सत्रअखेर अशा कंपन्यांचे मूल्य ९.३ टक्क्यांपर्यंत घसरले होते.
भाडेवाढ टाळणारा मात्र माहिती तंत्रज्ञान, मोबाइल, सीसीटीव्ही, माल वाहतूक, नवे रेल्वेमार्ग, नव्या गाडय़ा, स्वतंत्र रेल्वे मालवाहतूक मार्गिका, भांडारगृह उद्याने, इंजिननिर्मिती कारखाने, विद्युतीकरण, स्वच्छता व खानपान आदींवर भर देणारा रेल्वे अर्थसंकल्प केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी संसदेत सादर केला.
रेल्वे अर्थसंकल्प सुरू होण्यापूर्वीपासून बाजार किरकोळ वाढ नोंदवीत होता. उपाययोजनांबाबतच्या घोषणा झाल्यानंतरही संबंधित क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांमध्ये फारसा उत्साह दिसत नव्हता. अर्थसंकल्पातील तरतुदीपेक्षा वायदापूर्तीच्या अखेरच्या व्यवहाराची जाण ठेवून गुंतवणूकदारांनी बाजारात व्यवहार केले.

Untitled-24