अल्प व्याजदर हे प्रसंगी वित्त व्यवस्थेवर दबाव निर्माण करून एखाद्या आर्थिक संकटाला निमंत्रण देऊ शकतात, अशा शब्दात रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी आपल्या पहिल्यावहिल्या पतधोरणात उचलेल्या व्याजदर वाढीच्या हत्याराचे समर्थन केले. देशात सध्या महागाई हा चिंतेचा विषय असून ती तूर्त वाढतच आहे, असेही ते म्हणाले.
फ्रॅन्कफर्ट येथे राजन यांना ‘डॉइशे बँके’तर्फे वित्तीय क्षेत्रातील अर्थप्रावीण्याचा पुरस्कार देण्यात आला.  बँकेच्या पाचव्या म्हणजे २०१३ सालासाठीच्या पुरस्काराचे ते मानकरी ठरले. अर्थक्षेत्रात जागतिक स्तरावर केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी तो दिला गेला.
राजन या वेळी म्हणाले की, अर्थसमस्यांशी व्याजदराचा संबंध असून कमी व्याजदर अनेकदा बँका तसेच वित्तसंस्थांना गुंतवणूक करण्यास भाग पाडतात; मात्र व्यवसाय वृद्धीत ते भर  घालतीलच याबाबत साशंकता आहे. गुंतवणूक क्षेत्रातील अनिश्चितता कायम राहिल्यास व्याजदरात कपात करण्याची संधी कमी आहे. सद्यस्थितीत आम्ही यासंबंधीच्या भूमिकेवर ठाम आहोत. परिस्थिती कशी सुधारते त्यावर आगामी निर्णय अवलंबून असेल.
महागाईचा उल्लेख करताना ते म्हणाले की, अन्न आणि इंधनासाठी जेव्हा खिशाला झळ बसते तेव्हा महागाई वाढल्याचे प्रकर्षांने जाणवते. केवळ अन्नधान्यच नव्हे तर इतर घटकही एकूण महागाई वाढविण्यास कारणीभूत ठरत आहेत, असे तेव्हा लक्षात येते. तूर्त महागाई चढीच आहे आणि ती चिंताजनक पातळीवर नक्कीच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.