टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी देशांतर्गत फुललेली ऑनलाइन महापेठ ‘स्नॅपडील’मध्ये भांडवली गुंतवणूक केल्याचे बुधवारी जाहीर केले. पुढील वर्षी मार्चपर्यंत ही पेठेचे व्यापारमूल्य २ अब्ज अमेरिकी डॉलपर्यंत वधारण्याचा भरवसाही त्यांनी या गुंतवुकीनंतर व्यक्त केला.
स्नॅपडीलनेही रतन टाटांकडून झालेल्या या गुंतवणुकीची कबुली दिली असून, त्यांची ही गुंतवणूक ‘व्यक्तिगत’ स्वरूपाची असल्याचे म्हटले आहे. स्नॅपडीलचे सहसंस्थापक कुणाल बहल यांनी टाटा यांच्यासारख्या उत्तुंग प्रतिभेच्या व्यक्तीकडून आपल्याला व आपल्या संघाला शिकण्यासारखे भरपूर काही असल्याचे मत व्यक्त केले. तथापि गुंतवणुकीची रकमेबद्दल खुलासा करण्यास त्यांनी नकार दर्शविला. स्नॅपडीलने अलीकडेच विविध गुंतवणूकदारांकडून सुमारे ६०० कोटी रुपये (१० कोटी अमेरिकी डॉलर) उभे केले असून, या गुंतवणूकदारांमध्ये टेमासेक, ब्लॅकरॉक, मायराइड, प्रेमजी इन्व्हेस्ट आणि टारबोर्न यांचा समावेश होतो. त्या आधी फेब्रुवारीमध्ये कंपनीचे विद्यमान गुंतवणूकदार ईबेकडून आणखी ८३० कोटी रुपयांची  (१३.३७ कोटी डॉलर) गुंतवणूक मिळविली आहे.