18 September 2020

News Flash

ईएलएसएस कर वजावट आणि करमुक्त संपत्ती निर्माणाचे तिहेरी लाभ

शेवटचे काही दिवस उरलेत. वेतन उत्पन्नाला कराच्या कात्रीतून वाचवायचे तर गुंतवणूक करायलाच हवी.

शेवटचे काही दिवस उरलेत. वेतन उत्पन्नाला कराच्या कात्रीतून वाचवायचे तर गुंतवणूक करायलाच हवी. वर्षांतील हा काळ हा असा शेवटच्या क्षणी होणाऱ्या गुंतवणूक घाईचा आहे. प्राप्तिकर कायद्याचे कलम ८० सी, व्यक्ती/अविभक्त हिंदू कुटुंब (एचयूएफ) यांना वार्षिक उत्पन्नातून रु. १.५ लाखांपर्यंत वजावटीची संधी मिळते. ही वजावट प्राप्त करण्यासाठी तितक्या रकमेची गुंतवणूक करावी लागते. या कलमानुसार अशा गुंतवणुकीचे अनेकविध पर्याय जसे समभागसंलग्न बचत योजना (इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम्स- ईएलएसएस), आयुर्विमा, पीपीएफ, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) आणि बँकेतील मुदत ठेवी वगैरे खुले आहेत. पारंपरिकरीत्या कर वाचविण्यासाठी निश्चित लाभ देणाऱ्या विशिष्ट स्थिर उत्पन्न पर्यायांकडे लोकांचा कल असतो. मात्र त्यातून मिळणारा परतावा हा जेमतेम महागाई दरापेक्षा थोडा अधिक किंवा काही प्रसंगी तितकाही नसतो. त्यामुळे अल्पावधीसाठी पैसा अडकून राहील (छोटा लॉक-इन कालावधी) अशा आणि महागाईपश्चात सकारात्मक परतावा मिळवून देणाऱ्या गुंतवणूक पर्यायांचा करदात्यांनी माग घेणे खूपच आवश्यक बनले आहे.

ईएलएसएस फंड हा असा पर्याय आहे जो या दोन्ही पैलूंबाबत अधिक गुणवान कामगिरी असणारा आहे. कलम ८० सी अन्वये करबचतीच्या अन्य गुंतवणूक पर्यायांच्या तुलनेत ईएलएसएसचा लॉक-इन कालावधी खूपच छोटा तीन वर्षांचा आहे. शिवाय दीर्घ मुदतीत करबचतीच्या लाभासह दमदार परतावा देण्याची शक्यता या गुंतवणुकीत सर्वाधिक आहे.

ईएलएसएस ही म्युच्युअल फंड योजनांची एक वर्गवारी आहे, ज्यात गुंतवणूक सुरू झाल्याच्या तारखेपासून तीन वर्षे गुंतलेला पैसा कुलूपबंद (लॉक्ड-इन) असतो. या फंडातून बहुतांश गुंतवणूक ही विशिष्ट उद्योग क्षेत्र आणि बाजार भांडवलाचे बंधन न ठेवता सरसकट समभागांमध्ये केली जाते. ईएलएसएस हे अन्य समभागसंलग्न (इक्विटी) फंडांप्रमाणेच वृद्धी आणि लाभांश असे दोन पर्याय गुंतवणूकदारांना देतात. परतावा तसेच लाभांश उत्पन्न हा पूर्णपणे करमुक्त आहे. म्हणजे गुंतवणूक करताना आणि गुंतवणुकीची परिपक्वता दोन्ही समयी हा कर कार्यक्षम पर्याय आहे.

हे फंड वर म्हटल्याप्रमाणे डायव्हर्सिफाइड इक्विटी फंड असल्याने बाजारातील चढ-उतार जोखिमांचा अधीन असतात, अन्य करबचत पर्यायांना अशी जोखीम नसते; तथापि समभाग गुंतवणुकीत अल्पावधीत प्रचंड चढ-उतार दिसत असले तरी दीर्घ मुदतीत यातून श्रेष्ठ परतावा मिळाल्याचे आणि महागाईला मात देणारे ते सर्वोत्तम साधन असल्याचे ऐतिहासिकरीत्या सिद्ध झाले आहे.

गुंतवणूकदारांच्या दृष्टीने पाहिल्यास, फंडाच्या लॉक-इन कालावधीतून समभागांत दीर्घावधीसाठी गुंतवणुकीच्या लाभाशी गुंतवणूकदारांना जोडले जाते. प्रारंभी एकरकमी अथवा दरमहा एसआयपीच्या रूपाने या फंडात गुंतवणूक केली जाते. मात्र एसआयपी गुंतवणुकीलाही त्या त्या तारखेपासून तीन वर्षांसाठी कुलूपबंद कालावधी लागू होतो.

प्रत्येक गुंतवणूकदाराच्या आर्थिक नियोजनात करबचतीचा पर्याय म्हणून ईएलएसएस फंड हा गुंतवणूक भांडाराचा आवश्यक घटक असायलाच हवा. मोठय़ा अवधीत कर म्हणून वाचविली जाणारी रक्कम विलक्षण असेलच, शिवाय दीर्घावधीसाठी निश्चित केलेल्या आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेच्या दिशेनेही यातून लक्षणीय संपत्ती निर्माणाच्या शक्यता लक्षात घ्यायला हव्यात. स्व-मालकीचे घर, विदेशात सहल, मुलांचे शिक्षण, त्यांची लग्नं वगैरे दूरची स्वप्ने साकारण्याचा मार्ग ईएलएसएस फंडातून शक्य बनेल.

सारांशात, ईएलएसएस फंडातून तिहेरी फायदे : गुंतवणूकसमयी कर वजावट, भांडवलवृद्धी आणि परिपक्वतेसमयी करमुक्त लाभ मिळविले जाऊ  शकतात. तरीही अन्य म्युच्युअल फंडाप्रमाणे ही गुंतवणूक बाजार जोखिमांच्या अधीन आहे हे लक्षात असू द्यावे. अर्थात सेक्टोरल, थिमॅटिक अथवा मार्केट कॅपशी संलग्न फंडाच्या तुलनेत जोखिमेची मात्रा निश्चितच कमी आहे. एकंदरीत गुंतवणुकीच्या दृष्टीने फायद्यांचे जड असलेले पारडे पाहता, दीर्घावधीत चांगली संपत्ती निर्माण करू पाहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ईएलएसएस हा एक मोठय़ा संधीचे दालन खुले करणारा पर्याय निश्चितच आहे.

रवी गोपालकृष्णन

लेखक कॅनरा रोबेको एएमसीचे समभाग गुंतवणुकीचे प्रमुख

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2017 1:54 am

Web Title: ravi gopalakrishnan
Next Stories
1 ‘डिस्कव्हरी’चा नवीन क्रीडा वाहिनीसह भारतात विस्तार
2 डेबिट कार्डधारकांसाठी खूशखबर!; व्यवहारांवरील शुल्क होणार कमी
3 बँक खात्यातून कितीही पैसे काढा!; १३ मार्चपासून निर्बंध उठवणार
Just Now!
X