बंगळूरु : देशातील दुसऱ्या क्रमांकाची माहिती तंत्रज्ञान कंपनी इन्फोसिसच्या स्वतंत्र संचालकपदाचा रवी व्यंकटेशन यांनी शुक्रवारी राजीनामा दिला. इन्फोसिससारखी एक भक्कम कंपनी आता एका चांगल्या नेतृत्वाखाली वाटचाल करत असल्याची प्रतिक्रिया देत व्यंकटेशन यांनी सोडचिठ्ठी दिली.

माहिती तंत्रज्ञान कंपनीचे माजी सहअध्यक्ष राहिलेले कृष्णन हे इन्फोसिसच्या संचालक मंडळात २०११ मध्ये सहभागी झाले होते. नवीन संधी मिळाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. तर व्यंकटेशन यांनी आपली कंपनीतील सात वर्षांची कारकीर्द ही खूपच उत्साहवर्धक, सन्मानाची राहिली, असे म्हटले. इन्फोसिसमध्ये व्यंकटेशन हे काही काळ सहअध्यक्षही होते. त्याचबरोबर ते यापूर्वी मायक्रोसॉफ्ट इंडिया, कमिन्स इंडियाचे अध्यक्षही राहिले आहेत. रॉकफेलर फाऊंडेशनच्या संचालक मंडळावर ते सध्या आहेत. नंदन निलेकणी यांनी इन्फोसिसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर व्यंकटेशनच्या रूपात मोठे निर्गमन घडले आहे.