बिटकॉइनसारख्या आभासी चलनाला प्रोत्साहन देणाऱ्या यंत्रणांपासून व्यापारी बँकांनी दूर राहण्याचे आवाहन करतानाच रिझव्‍‌र्ह बँकेने गुरुवारी स्वत:चे डिजिटल चलन सादर करण्याची इच्छा व्यक्त केली. गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी पतधोरण बैठकीनंतर सांगितले की, याकरिता समिती स्थापन करण्यात येत असून तिचा जून २०१८ पर्यंत अहवाल येणे अपेक्षित आहे.

व्यापारी बँकांसह सर्वच यंत्रणांना आभासी चलनाशी संबंधित कोणतीही सेवा पुरविण्यास मज्जाव करण्यात आला आहे. निधीचा गैरवापर आणि ग्राहकहिताकरिता ही बाब आवश्यक असून बिटकॉइनसह सर्वच आभासी चलनामुळे गुंतवणुकीची जोखीम विस्तारते, असा दावाही यानिमित्ताने करण्यात आला आहे. आभासी चलनांना ज्या वित्तीय संस्थेसारख्या यंत्रणा सहकार्य करत आहेत त्यांनी ते नजीकच्या कालावधीत थांबविण्यासाठी लवकरच आदेश जारी केला जाईल, असेही रिझव्‍‌र्ह बँकेने स्पष्ट केले आहे.