रिझव्‍‌र्ह बँक ७ टक्क्यांपुढील अर्थवेगाबाबत साशंकच

मुंबई : पाच वर्षांच्या तळाला पोहोचलेल्या अर्थव्यवस्थेला उभारीचा प्रयत्न म्हणून रिझव्‍‌र्ह बँकेने बुधवारी थेट ०.३५ टक्के व्याजदर कपात जाहीर केली. असे असूनही चालू वित्त वर्षांतील सकल राष्ट्रीय उत्पादनाचा दर ७ टक्क्यांखालीच असेल, हा अंदाजही तिने वर्तविला. सलग  चौथ्या कपातीने जवळपास दशकाच्या नीचांकाला आलेल्या रेपो दरामुळे मागणी थंडावलेल्या गृह, वाहनादी कर्जाला मागणी वाढण्याची आशा निर्माण झाली आहे.

आर्थिक वर्ष २०१९-२० च्या तिसऱ्या द्विमासिक पतधोरण आढाव्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण निर्धारण समितीची तीन दिवसांची बैठक बुधवारी संपली. गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पतधोरण समितीच्या चार सदस्यांनी ०.३५ टक्के दर कपातीचा, तर दोन सदस्यांनी ०.२५ टक्के कपातीचा कौल दर्शविला. अखेर ०.३५ टक्के दर कपातीवर शिक्कामोर्तब करीत रेपो दर ५.४० टक्के असा एप्रिल २०१० नंतरच्या किमान स्तरावर आणण्यात आला.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण समितीची आगामी बैठक १, ३ व ४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. दरम्यान, बुधवारच्या पतधोरणात व्याजदर कपातीपेक्षा खुंटविण्यात आलेल्या अर्थवेगाचे भांडवली बाजारावर तीव्र सावट पडले. परिणामी सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांक मंगळवारच्या तुलनेत पाऊण टक्क्यानी खाली आले.

बँक, उद्योग, वित्त क्षेत्राकडून यंदा पाव टक्के दर कपात अपेक्षिण्यात आली होती. प्रत्यक्षात त्यापेक्षा अधिक दर कपात केली गेली. यापूर्वीच्या सलग प्रत्येकी पाव टक्के दर कपातीमुळे २०१९ मध्ये आतापर्यंत रेपो दर एकूण १.१० टक्क्यांनी कमी झाला आहे. चालू वित्त वर्षांत विकासाचा वेग ६.९ टक्के असेल व महागाईचा दर ३ टक्क्यांच्या आसपास असेल, असे रिझव्‍‌र्ह बँकेने म्हटले आहे.

यापूर्वी एप्रिल २०१२ ते मे २०१३ दरम्यान सलग चार वेळा दर कपात केल्यामुळे रेपो १.२५ टक्क्याने कमी होत ७.२५ टक्क्यांवर आला होता.

मंदीच्या कबुलीसह विकास दराच्या अंदाजात ६.९ टक्क्य़ांपर्यंत कपात

मुंबई : देशाची अर्थव्यवस्था ही मंदीच्या चक्रात असल्याची कबुली देताना, मंदीचे आवर्तन हे तात्पुरते असून, त्यातून कोणतीही संरचनात्मक जोखीम संभवत नसल्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले. गेल्या काही महिन्यांत अर्थव्यवस्थेबाबत दिलासा देणारे कोणतेही सांख्यिकी संकेत नाहीत. वाहनांची विक्री जुलैमध्ये २० महिन्यांच्या नीचांक स्तरावर आहे. औद्योगिक उत्पादन दराने जूनमध्ये ५७ महिन्यांचा तळ दाखविला. घसरत्या निर्यातीची आकडेवारी आणि भांडवली बाजारात निरंतर सुरू असलेली पडझड बरोबरीने जागतिक स्तरावर दाटलेले व्यापार युद्धाचे काळे ढग या साऱ्यांचा गव्हर्नरांनी आपल्या समालोचनात वेध घेतला. परिणामी रिझव्‍‌र्ह बँकेने देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या दराचा (सकल राष्ट्रीय उत्पादनातील वाढ) अंदाज हा सरलेल्या जूनमध्ये घोषित ७ टक्क्य़ांवरून ६.९ टक्के असा खालावत आणला आहे.

मागणी आणि गुंतवणुकीचा अभाव यांचा एकत्रितपणे अर्थवृद्धीवर परिणाम होत आहे. या क्षणी मंदीचे आवर्तन हे तात्कालिक स्वरूपाचे आहे आणि कदाचित खोल संरचनात्मक जोखीम यातून संभवणार नाही. तथापि यातून संरचनात्मक सुधारणांसाठी वाव निर्माण झाला आहे हे नक्की आणि त्या संबंधाने सरकारशी निरंतर संवाद सुरू आहे.

’  गव्हर्नर शक्तिकांत दास (पतधोरण बैठकीनंतर पत्रकारांशी वार्तालापादरम्यान)

०.३५ टक्के कपात संतुलित

* रूढ प्रथेला छेद देत ०.३५ टक्क्य़ांची कपात करण्याच्या पतधोरण समितीच्या निर्णयाचे समर्थन रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केले. रेपो दरात कपातीच्या निर्णयाबाबत समितीच्या सर्व सदस्यांचे एकमत असले तरी चार जणांनी ०.३५ टक्के, तर दोघांनी ०.२५ टक्के कपातीचा कौल दिला. पाव टक्क्य़ांची कपात प्राप्त स्थितीत पुरेशी ठरणार नाही आणि अर्धा टक्क्य़ांची कपात वाजवीपेक्षा जास्त ठरेल, असे सदस्यांचे मत बनले. त्यामुळे देशांतर्गत आणि जागतिक घडामोडींसंबंधाने संतुलित दृष्टिकोन ठेवून आणि पर्याप्त ठरेल अशा ०.३५ टक्के कपातीचा निर्णय घेतला गेला, असे त्यांनी स्पष्ट केले.

कपातीचे फक्त ०.२९ टक्के हस्तांतरण

*  रिझव्‍‌र्ह बँकेने यापूर्वी सलग तीनदा केलेल्या एकूण पाऊण (०.७५) टक्के रेपो दर कपातीपैकी वाणिज्य बँकांकडून जेमतेम एक-तृतीयांश म्हणजे ०.२९ टक्के इतकेच हस्तांतरण सामान्य कर्जदारांपर्यंत केले गेले आहे. बँकांनी अधिक तत्परतेने व अधिक प्रमाणात व्याजदर कपात करून कर्जे स्वस्त करायला हवीत, असे आवाहन गव्हर्नर दास यांनी केले. व्याजाचे दर चढे राहतील यासाठी बँकांकडून गटबाजी केली जात आहे काय, या प्रश्नाला मात्र त्यांनी नकारार्थी उत्तर दिले. परिस्थितीवर रिझव्‍‌र्ह बँकेचे लक्ष असून, दर कपातीच्या हस्तांतरणासाठी आवश्यक पावले टाकली जात आहेत.

एनईएफटी व्यवहार अहोरात्र शक्य

*  एिका बँकेतून दुसऱ्या बँकेतील खात्यात निधी हस्तांतरणाचे ‘एनईएफटी’ व्यवहार हे येत्या डिसेंबरपासून संपूर्ण दिवसभरात केव्हाही करता येऊ शकतील. डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने हे आणि आरटीजीएस व्यवहार अलीकडेच नि:शुल्क करण्याचे बँकांना सूचित केले आहे. एका वेळी २ लाख रुपयांपर्यंत रक्कम हस्तांतरित करण्याची एनईएफटी सुविधा सध्या सकाळी ८ वाजल्यापासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत खातेदारांना खुली असेल. येत्या डिसेंबरपासून ते दिवसाचे २४ तास आणि आठवडय़ाचे सातही दिवस हे व्यवहार शक्य होतील.