देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाला म्हणजेच एसबीआयला केंद्रीय बँक असणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआयने) कोट्यावधींचा दंड केला आहे. १६ मार्च रोजी आरबीआयने जारी केलेल्या एका पत्रकानुसार एसबीआयने काही नियामक पालनांची पूर्तता न केल्याने हा दंड ठोठावण्यात आला आहे. आरबीआय़ने १५ मार्च २०२१ रोजी जारी केलेल्या एका आदेशामध्ये हा दंड ठोठावण्यात आलाय. आरबीआयकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकामध्ये, “हा दंड नियामक पालनांची (रेग्युलेटरी कप्लायन्सची) पूर्तता न केल्याने ठोठावण्यात येत आहे,” असं नमूद करण्यात आलं आहे.

एसबीआयने बँक व्यवस्थापनासंदर्भातील काही नियमांचे उल्लंघन केल्याचं आणि कमिशन म्हणून बँकेच्या कर्मचाऱ्यांना बक्षीस स्वरुपात निधी देण्यासंदर्भात निर्देशांचे उल्लंघन केल्याचं आरबीआयने म्हटलं आहे. ही कारवाई नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी आहे असं आरबीआयने स्पष्टपणे नमूद केलं आहे.

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार ३१ मार्च २०१७ ते ३१ मार्च २०१८ दरम्यान बँकेच्या आर्थिक परिस्थितीचा पहाणी करण्यात आली. त्याबरोबर आरबीआयने रिस्क असेसमेंट अहवालाचीही तपासणी केली. या तपासणीनंतर एसबीआयकडून कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या कमिशनसंदर्भात स्पष्टीकरण आरबीआयने मागवलं. मात्र एसबीआयने दिलेल्या स्पष्टीकरणाने केंद्रीय बँकेचं समाधान झालं नाही. हे स्पष्टीकरण देण्यात आल्यानंतरही बँकेने नियमांचं उल्लंघन करत कमिशन दिल्याचं आरबीआयचं म्हणणं होतं. त्यामुळेच एसबीआयला दोन कोटींचा दंड ठोठावण्यात आलाय.

रिझर्व्ह बँकेने बँक नियामन कायदा १९४९ अंतर्गत असणाऱ्या कलम १० (१) (ब) (२) चे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि कर्मचाऱ्यांना कमिशन देण्याच्या नियमांचं एसबीआयने उल्लंघन केल्यामुळे दोन कोटींचा दंड ठोठावण्यात येत असल्याचं म्हटलं आहे.