बँका, वित्तसंस्थांचा ८६,००० कोटींचा दावा नाकारला

नवी दिल्ली : अनिल अंबानी यांच्या रिलायन्स – एडीएजी समूहातील कर्जबाजारी रिलायन्स कम्युनिकेशन्सकडे २६,००० कोटी रुपयांची देणी थकीत असल्याचे समूहाने स्पष्ट केले आहे. विविध बँका तसेच वित्तसंस्थांनी याबाबत केलेला ८६,००० कोटी रुपयांच्या देणीबाबतचा दावा मात्र समूहाने नाकारला आहे.

दूरसंचार क्षेत्रातील रिलायन्स कम्युनिकेशन्स कर्ज थकविल्याने ठप्प आहे. कंपनीतील काही व्यवसाय थोरले बंधू मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओला विकण्यात आला आहे. कंपनीकडे देणी फेडण्यासाठी रक्कम नसल्याची कबुली अनिल अंबानी यांनी विदेशातील काही न्यायालयीन प्रकरणात काही दिवसांपूर्वीच केली होती.

रिलायन्स कम्युनिकेशन्सची सध्या नादारी व दिवाळखोरी प्रक्रिया पार पडत आहे. राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरणाला समूहाने ही देणी २६,००० कोटी रुपयांचीच असल्याचे सांगितले आहे. तर कंपनीकडे ४९,००० कोटी रुपये व रिलायन्स टेलिकॉमकडे २४,००० कोटी रुपये तसेच रिलायन्स इन्फ्राटेलकडे १२,६०० कोटी रुपये थकीत असल्याचे बँका, वित्तसंस्थांनी लवादापुढे स्पष्ट केले आहे.

रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या पुनर्बाधणीचा आराखडा कर्जपुरवठा करणाऱ्या बँकांनी मंजूर केला असून त्याला लवादाच्या विविध मंजुरीची प्रतीक्षा आहे. थकीत कर्जापैकी ७० टक्के रक्कम परत मिळविण्यात बँकांना यश येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

२०१६ पासून रिलायन्स कम्युनिकेशन्सवरील आर्थिक ताण वाढत गेला. रिलायन्स जिओच्या मोफत सेवेचा फटका या कंपनीलाही बसला. गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय दूरसंचार व्यवसायातील व्यवसाय एअरसेल, सिस्टेमा, व्हिडीओकॉन, टाटा डोकोमो यूनिनॉर कंपन्यांना गुंडाळावा लागला.