मुंबई : निधीची चणचण भासत असलेल्या स्थावर मालमत्ता क्षेत्राची रिझव्‍‌र्ह बँकेने पतधोरणातून व्याज दरात फेरबदल केले नसल्याने निराशा झाल्याची प्रतिक्रिया नोंदविली आहे. या क्षेत्राशी निगडित अनेकांनी गुरुवारचा मध्यवर्ती बँकेचा निर्णय धक्कादायक असल्याचे म्हटले आहे.

थंडावलेल्या घरांच्या मागणीला चालना देण्यासाठी व्याजदरात कपात आणि पर्यायाने कर्जाच्या दरात स्वस्ताईची सार्वत्रिक अपेक्षा या उद्योग क्षेत्रात होती. नारेडकोचे राष्ट्रीय अध्यक्ष निरंजन हिरानंदानी यांनी पाव टक्क्य़ांची थोडीथोडकी नव्हे तर थेट एक टक्क्य़ाने व्याजदर कपात केली जायला हवी, असे मत व्यक्त केले. देशाच्या अथव्यवस्थेला उभारी देण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या अनेकांगी उपाययोजनांना ते पूरकच ठरले असते, असे ते म्हणाले.

आता अपेक्षेप्रमाणे पाव टक्क्य़ांची रेपो दरात कपात रिझव्‍‌र्ह बँकेने केली असती, तर गृहकर्जासाठी व्याजाचे दर प्रथमच आठ टक्क्य़ांखाली आणता येऊ शकले असते, असे मत अनारॉकचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी व्यक्त केले. घरखरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी तो मोठा भावनिक दिलासा ठरला असता आणि या उद्योग क्षेत्रासाठी ते स्वागतार्ह पाऊल ठरले असते, असे ते म्हणाले.

मोठय़ा प्रमाणात न विकली गेलेली घरे, मंदावलेली मागणी आणि अडचणीत असलेल्या बँकेतर वित्तीय कंपन्यांमुळे वित्तपुरवठाही रोडावल्याने अनेक चालू असलेले प्रकल्प रखडलेले, अशा कोंडीत सापडलेले स्थावर मालमत्ता क्षेत्र आता फेब्रुवारीतील अर्थसंकल्पाकडे आस लावून बसले आहे.

*  यापूर्वी कमी केलेल्या व्याजदराचा फायदा बहुतांश बँकांनी ग्राहकांपर्यंत पोहोचवलेला नाही. समग्र दृष्टिकोनातून परिस्थितीकडे पाहिले तर, व्याजदर कपातीपेक्षा  विकसकांच्या कर्जाची पुनर्रचना, तसेच गृहकर्ज व्याजदर सवलत योजनेची पुन:प्रस्तुती आणि स्थावर मालमत्ता क्षेत्राला वित्तपुरवठा सुरळीत करण्यासाठी पावले अधिक आवश्यक आहेत.

* राजन बांदेलकर, अध्यक्ष, नारेडको महाराष्ट्र

*  आर्थिक विकासाला अग्रक्रम मिळेल अशी अपेक्षा असताना, रिझव्‍‌र्ह बँकेचा व्याज दर कमी न करण्याचा निर्णय आश्र्च्र्यकारक व निराशाजनक आहे. व्याजदर घटल्याने स्थावर मालमत्ता आणि वाहन या सारख्या  क्षेत्रांना आवश्यक चालना मिळाली असती. थांबा व वाट पाहा असा तूर्त सावध दृष्टिकोन दिसत असला तरी पुढील बठकीत दरकपातीची शक्यता आहे.

* शिशिर बजल, अध्यक्ष, नाइट फ्रँक इंडिया