नवउद्यमींना पंतप्रधानांचे आवाहन

नवी दिल्ली : देशातील कृषी, पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, नवमाध्यमी शिक्षण आदी क्षेत्रांत येणाऱ्या कालावधीत पुरेपूर संधी असून करोनासारख्या समस्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्यनिगा पायाभूत सुविधा तसेच एकूणच अर्थव्यवस्थेची पुनर्बाधणी करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले.

‘व्हिवाटेक’ या तंत्रस्नेही परिषदेला संबोधित करताना पंतप्रधानांनी, देशातील नवउद्यमींना, भविष्यातील आव्हानात्मक अर्थव्यवस्थेच्या पुनर्रचनेसाठी अनेक क्षेत्रांबरोबरच आरोग्य क्षेत्रातील अद्ययावत पायाभूत सुविधा पुरविण्यावर जोर दिला. देशाच्या शाश्वत विकास वृद्धीसाठी सरकारदेखील सातत्याने सुधारणा राबवत असून वैश्विक महासाथ प्रसारादरम्यान गरिबांना मोफत अन्न वितरणासारख्या योजना विस्तारत आहे, असेही मोदी यांनी सांगितले.

पारंपरिकता जेव्हा अपयशी ठरते तेव्हा नावीन्य सार्थ ठरते, असे नमूद करत पंतप्रधानांनी, करोना चाचणीसाठी झालेले दिवसागणिकचे शास्त्रीय, संशोधनात्मक बदल यांचा उल्लेख केला. तंत्रस्नेही माध्यमाच्या वापराने आपण हा कालावधी अधिक सुसह्य़ केला, असेही ते म्हणाले.