अर्थव्यवस्थेवर दाटलेले मंदीचे ढग करोनाच्या कहराने अधिक गहिरे केल्याच्या परिणामी भारतात विदेशातून होणारी तेलाव्यतिरिक्तची आयात लक्षणीय घसरली आहे. मात्र या घटकाचा परिणाम म्हणून सलग दुसऱ्या तिमाहीत देशाच्या चालू खाते ही तुटीकडून शिलकीत परिवर्तित झाल्याचे दिसून येत आहे.

एप्रिल-जून २०२० तिमाहीत भारताच्या चालू खात्यावर १९.८ अब्ज अमेरिकी डॉलरची शिल्लक असून, ती सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीच्या ३.९ टक्के अशा विक्रमी स्तरावर पोहोचली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने बुधवारी ही आकडेवारी जाहीर केली. या आधीच्या जानेवारी ते मार्च २०२० या तिमाहीत चालू खाते ६० कोटी डॉलरने शिलकीत होते. जीडीपीच्या तुलनेत हे प्रमाण ०.१ टक्के इतके होते. गतवर्षी याच तिमाहीत चालू खात्यावर १५ अब्ज डॉलर म्हणजे जीडीपीच्या २.१ टक्क्यांची तूट होती.

एप्रिल-जून तिमाहीत देशाच्या परराष्ट्र व्यापारातील तूट अर्थात आयात-निर्यात व्यापारातील तफावत लक्षणीय सावरून १० अब्ज डॉलर इतकी मर्यादित राहिली असल्याचा परिणाम म्हणून चालू खात्यावर वरकड दिसून येत आहे, असे रिझव्‍‌र्ह बँकेने स्पष्ट केले आहे.

देशांतर्गत मागणीविना आयात वस्तूंचा ओघ घटण्याची ही स्थिती संपूर्ण आर्थिक वर्षांत कायम राहणे अपेक्षित आहे. त्यामुळे ‘इक्रा’ या पतमानांकन संस्थेने मार्च २०२१ पर्यंत चालू खात्यावर ३० अब्ज डॉलरची म्हणजे जीडीपीच्या तुलनेत १.२ टक्के शिल्लक असेल, असा कयास व्यक्त केला आहे.