मुंबई : आयडीएफसी म्युच्युअल फंडाची मालमत्ता खरेदी करण्यासाठी सुरू असलेल्या प्रक्रियेत अमेरिकेतील न्यू यॉर्कस्थित ब्लॅकरॉक समूह आणि रिलायन्स निप्पॉन लाइफ अ‍ॅसेट मॅनेजमेंट लिमिटेड यांपैकी एकाकडून बाजी मारली जाण्याची शक्यता म्युच्युअल फंड वर्तुळात ऐकायला मिळत आहे.

आयडीएफसी म्युच्युअल फंडाच्या विक्री प्रक्रियेचा पहिला टप्पा मंगळवारी मुंबईत पार पडला. या टप्प्यात सर्वाधिक बोली लावणारा ब्लॅकरॉक समूह आणि अनिल धीरुभाई अंबानी नियंत्रित रिलायन्स म्युच्युअल फंड असल्याचे कळते. डीएसपी-ब्लॅकरॉक या संयुक्त कंपनीतील आपला हिस्सा डीएसपीला पूर्णपणे विकून बाहेर पडलेला ब्लॅकरॉक समूह भारतात स्वबळावर घरवापसी करू इच्छित आहे. म्युच्युअल फंड मालमत्तेच्या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला रिलायन्स निप्पॉनचेही आक्रमक विस्ताराचे मनसुबे आहेत.

आयडीएफसी म्युच्युअल फंड ७० हजार कोटींच्या मालमत्तेचे व्यवस्थापन पाहत असून मालमत्तेच्या क्रमवारीत ११व्या क्रमांकावरील फंड घराणे आहे. आयडीएफसी म्युच्युअल फंड खरेदी करण्यात यश आल्यास रिलायन्स म्युच्युअल फंड ३.१५ लाख कोटी मालमत्तेचे व्यवस्थापन करणारा भारतातील पहिल्या क्रमांकाचा म्युच्युअल फंड ठरेल. त्या उलट ब्लॅकरॉक समूह यशस्वी ठरला तर त्याला भारतातील म्युच्युअल फंड व्यवसायात पुनरागमन करणे शक्य होईल.

आयसडीएफसी म्युच्युअल फंडाचे प्रवर्तक असलेल्या आयडीएफसी होल्डिंग्जने केलेल्या मालमत्ता व्यवसायाचे मूल्यांकन जरी ४,००० कोटी रुपये असे असले तरी हा व्यवहार दोन ते अडीच हजार कोटींदरम्यान होण्याची शक्यता आहे. आयडीएफसी समूहाचे अध्यक्ष राजीव लाल यांनी विक्री प्रक्रिया सुरू झाली असल्याचे मान्य करून संचालक मंडळ योग्य तो निर्णय घेईल, अशी स्पष्टोक्ती वृत्तसंस्थेकडे केली आहे.