नैसर्गिक वायूच्या किमतीत वाढीबाबत वादंग सुरू असतानाच, केंद्रीय तेल आणि वायूमंत्री एम. वीरप्पा मोईली यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे रिलायन्स इंडस्ट्रीजची रदबदली करणारी आणखी एक निवेदन पत्राद्वारे केले आहे.
मोईली यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या १३ पानी पत्रात, नैसर्गिक वायूच्या किंमतीत १ एप्रिलपासून होऊ घातलेल्या वाढीची प्रक्रिया, करारमदार आणि टप्प्यांचे स्पष्टीकरण केल्याचा दावा केला आहे. जरी करारात नमूद उद्दिष्टानुरूप जरी कृष्णा-गोदावरी खोऱ्यातून (केजी-डी ६) नैसर्गिक वायूचे उत्पादन होत नसले तरी कोणत्याही स्थितीत रिलायन्स इंडस्ट्रीजबरोबर केलेला करार मोडीत काढता येणार नाही, असे मोईली यांनी स्पष्ट केले आहे. जर ही खरेदी किमतीतील प्रस्तावित वाढ मान्य केली नाही, तर रिलायन्सबरोबरीनेच सरकारच्या ओएनजीसी या कंपनीलाही वायू उत्पादन हे आर्थिकदृष्टय़ा परवडणारे ठरणारी नाही, अशी पुस्तीही त्यांनी‘आम आदमी पक्षा’कडून होत असलेल्या आरोपांच्या पार्श्र्वभूमीवर जोडली आहे. वायू उत्पादनाने अपेक्षित प्रमाण न गाठल्याचा मुद्दा लवादाकडे प्रलंबित असल्याने रिलायन्स बरोबरचा करारही रद्दबातल होऊ शकत नाही, असे मोईली यांनी स्पष्ट केले.