अनिल अंबानी समूहातील कंपनीला तडाखा 

अनिल धीरुभाई अंबानी यांच्या रिलायन्स समूहातील आरोग्य विमा योजना विक्रीला विमा नियामकाने मनाई केली आहे. मात्र कंपनीला जुन्या आरोग्य विमा योजनांसाठीची सेवा नियमितपणे देता येईल.

कंपनीच्या विमाधारकांचे भविष्यातील दावे निकाली काढण्यासाठी करावयाच्या आर्थिक तरतुदींचे प्रमाण कमी झाल्याने इर्डाईने रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स कंपनीवर ही कारवाई केली आहे.

रिलायन्स हेल्थ इन्शुरन्सला येत्या १५ नोव्हेंबरपासून नवीन आरोग्य विमा योजनांची विक्री करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. कंपनीच्या विमाधारकांचे दायित्व वित्तीय मालमत्तांसह रिलायन्स जनरल इन्शुरन्सकडे हस्तांतरित करण्यासही बजाविण्यात आले आहे.

रिलायन्स कॅपिटलच्या अंतर्गत रिलायन्स जनरल इन्शुरन्सपासून रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी तयार करण्यात आली. या क्रियेला वर्ष होत नाही तोच पुरेशी आर्थिक तजवीज नसल्याचे कारण देत विमा नियामक यंत्रणेने रिलायन्स हेल्थ इन्शुरन्सच्या व्यवसायावर र्निबध आणले. याबाबतची पूर्तता महिन्याभराच्या आत करण्यासही कंपनीला बजाविण्यात आले आहे.

इर्डाईच्या अटीनुसार, विमाधारकांचे भविष्यातील दावे निकाली काढण्यासाठी करावयाच्या आर्थिक तरतुदींचे प्रमाण १५० टक्के असताना रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे हे प्रमाण १०६ टक्केच असल्याचे नमूद करण्यात आले आहे. जूनअखेरच्या कंपनीच्या या स्थितीनंतर ऑगस्टमध्ये ७७ टक्के व सप्टेंबर अखेरीस ते ६३ टक्क्यांपर्यंत येऊन ठेपले आहे. कंपनीने याबाबतची पूर्तता जूनपासून केलेली नाही, असा ठपकाही नियामकाने ठेवला आहे.