पदार्पणातच प्रस्थापित स्पर्धक दूरसंचार कंपन्यांना आव्हान ठरलेली रिलायन्स जिओ वर्षभरातच तोटय़ातून नफ्यात आली आहे. मुकेश अंबानी प्रवर्तित रिलायन्स इंडस्ट्रीजचा दूरसंचार व्यवसाय असलेल्या  रिलायन्स जिओला गेल्या तिमाहीत ५०४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. सप्टेंबर २०१६ पासूनच्या पदार्पणानंतर आधीच्या तिमाहीपर्यंत कंपनी तोटय़ात होती. व्यवसायाच्या पहिल्या तिमाहीतच कंपनीला २७१ कोटी रुपयांच्या तोटय़ाला सामोरे जावे लागले होते.

मुकेश अंबानी यांचा महत्त्वाकांक्षी व्यवसाय म्हणून रिलायन्स जिओचा उल्लेख होतो. सप्टेंबर २०१६ मध्ये त्यांनी या क्षेत्रात पुनप्र्रवेश केला. सुरुवातीला मोफत आणि नंतर स्वस्तात डाटा सुविधा देऊ करणाऱ्या रिलायन्स जिओमुळे एअरटेल, व्होडाफोन, आयडिया, रिलायन्स कम्युनिकेशन्सचा व्यवसाय तसेच मोबाइलग्राहक संख्येवर विपरीत परिणाम होऊ लागला.

जिओधारक १६ कोटींवर

रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या डिसेंबर २०१७ अखेर १६.०१ कोटींवर गेली आहे. तर परिचलन नफ्यात १२ टक्के वाढ झाली आहे. गेल्या तिमाहीत कंपनीने नवे २.१५ कोटी ग्राहक जोडले आहेत. तिमाहीत डाटा क्रयशक्तीही विक्रमी अशी ४३१ कोटी जीबी राहिली आहे. कंपनीच्या ग्राहकगणिक मिळणारा सरासरी महसूल (आरपू) प्रति माह १५४ रुपये नोंदला गेला आहे. दूरसंचार क्षेत्रात हे मानक नफा-तोटय़ासाठी महत्त्वाचे मानले जाते. तर डाटा क्रयशक्ती प्रति वापरकर्ता, प्रति मासिक ९.६ जीबी राहिली नोंदली गेली आहे.

रिलायन्स समूहातील किरकोळ व्यवसायानेही यंदा प्रथमच नफा नोंदविला आहे. तर या क्षेत्रातील महसूल तब्बल ११६ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. दरम्यान, रिलायन्स समूहाने ९,४२३ कोटी रुपये असा आतापर्यंतचा सर्वोत्तम ढोबळ नफा चालू आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीत नोंदविला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०१७ दरम्यान समूहाचा एकूण महसूल १.१० लाख कोटी रुपयांवर गेला आहे. वार्षिक तुलनेत नफ्यात २५.१ टक्के तर महसुलात ३०.५ टक्के वाढ झाली आहे.

इंधन व्यवसायातील लाभात घसरण; जीआरएम ११.६० डॉलरखाली

तेल व वायू उत्पादनात अग्रेसर असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा या व्यवसायातून होणारा लाभ मात्र यंदाच्या तिमाहीत घसरला आहे. कंपनीचा गेल्या तिमाहीतील ढोबळ शुद्धीकरण लाभ (जीआरएम) आधीच्या प्रति पिंप १२ डॉलरवरून यंदा ११.६० डॉलर प्रति पिंपपर्यंत खाली आला आहे. मात्र कंपनीने या व्यवसायातून सलग १२ तिमाही दुहेरी अंकातील लाभ कायम राखल्याचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे. वार्षिक तुलनेत मात्र कंपनीचा लाभ वाढला आहे. कंपनीच्या तेल व वायू व्यवसायाला २९१ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. शुद्धीकरण आणि विपणन व्यवसायाच्या माध्यमातून होणाऱ्या नफ्यातही यंदा किरकोळ घसरण झाली आहे.