देशाचे उद्यमशील अंग फुलवून, नवउद्योजकांच्या कल्पकता आणि प्रयोगशीलतेला तंत्र-तंत्रज्ञान, वित्तीय व कायदेशीर साहाय्य, व्यवस्थापनविषयक सल्ला अशी एकंदर व्यावसायिकतेची जोड देऊन यशस्वी उद्योगाची परिपूर्ण घडी बसेपर्यंत जोपासना करणारे प्रांगण खुले करण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि मायक्रोसॉफ्ट या जगद्विख्यात महाकाय कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. ‘जेननेक्स इनोव्हेशन हब’ नावाचे हे पहिले केंद्र येत्या ऑक्टोबरमध्ये मुंबईपासून सुरुवात करीत असून, लवकरच देशांतील अन्य शहरांमध्येही त्याची पुनरावृत्ती केली जाईल, असे जेननेक्स व्हेन्चर्सचे अध्यक्ष आणि ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी शुक्रवार येथे बोलताना सांगितले.
रिलायन्स इंडस्ट्रीजची उद्यम गुंतवणूकविषयक उपकंपनी जेननेक्स्ट व्हेन्चर्स आणि मायक्रोसॉफ्ट, इंडिया या कंपन्यांनी हे ‘जेननेक्स्ट इनोव्हेशन हब’ स्थापण्यासाठी तीन वर्षांच्या भागीदारी करारावर शुक्रवारी स्वाक्षऱ्या केल्या. नवोदित कंपन्यांचा आकडा वर्षांगणिक वाढत असला तरी भारतात हे क्षेत्र म्हणावे तितके प्रगत झालेले नाही, असे नमूद करून डॉ. माशेलकर यांनी त्यांच्या कंपनीचा हा भागीदार उपक्रम नवोदित कंपन्यांना यशस्वी होण्याकरिता शक्य ती सर्व संसाधने पुरविणाऱ्या राष्ट्रीय मंचाची कमतरता भरून काढेल, असे सांगितले. डॉ. माशेलकर आणि मायक्रोसॉफ्ट इंडियाचे अध्यक्ष भास्कर प्रामाणिक यांनी भागीदारी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. नवी मुंबईतील घणसोलीस्थित रिलायन्स कॉर्पोरेट पार्कमध्येच हे केंद्र सुरू होत आहे.
ही एक प्रकारची द्रुतगती विकास प्रक्रिया असून त्या नवोदित कंपन्यांना भेडसावणाऱ्या मंजुऱ्या व परवाने वगैर लालफीतशाहीचे अडथळे, वित्त, तंत्र-तंत्रज्ञान, कायदेशीर सल्ला, विपणन, बाजारपेठ, व्यवस्थापन आदी सर्वागाने साहाय्य करीत त्यांची जोपासना केली जाईल, अगदी मायक्रोसॉफ्टकडून आवश्यक सॉफ्टवेअरविषयक सल्लाही पुरविला जाईल, असे प्रामाणिक यांनी स्पष्ट केले. मुख्यत: आरोग्यनिगा, शिक्षण, डिजिटल माध्यम, मोबिलिटी, बिग डेटा आणि एम टू एम अशा निवडक सहा क्षेत्रांतील नवोदितांना हेरण्याचे या कार्यक्रमाने निश्चित केले असले तरी त्यापल्याडच्या क्षेत्रात उमेदीने व नवकल्पकतेने काही तरी करू इच्छिणाऱ्यांना प्रवेश खुला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या उपक्रमाच्या पहिल्या तुकडीत सहभागासाठी येत्या २५ सप्टेंबर २०१४ पर्यंत अर्ज दाखल करणे आवश्यक ठरेल. ँ३३स्र्://६६६.ॠील्लल्ली७३ँ४ु.ूे या वेबस्थळावर जाऊन नवोदितांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.
मायक्रोसॉफ्ट व्हेन्चर्सकडून या धर्तीचा केवळ माहिती-तंत्रज्ञान उद्योगासाठी द्रुतगती कार्यक्रम बंगळुरू येथे राबविण्यात आला असून गत तीन वर्षांत चार तुकडय़ांमध्ये २०५० नवउद्योजकांकडून अर्ज दाखल झाले, यापैकी २.५ टक्के अर्जदारांनी (५१ जणांना) जोपासना उपक्रमात सहभागी करून घेतले गेले आणि आजच्या घडीला यातील १२ जणांना पुढील टप्प्यातील अर्थसाहाय्यासाठी गुंतवणूकदार म्हणून अन्य कंपन्यांनी पुढाकार घेतला असल्याचा अनुभव प्रामाणिक यांनी सांगितला. जेननेक्स्टच्या बरोबरीने सुरू होत असलेला ताजा भागीदारी उपक्रम अधिक व्यापक रूप धारण करणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.