जागतिक मराठी चेंबरचे उद्योगरत्न पुरस्कार वितरित

मुंबई : मराठी माणसाने उद्योगात यशस्वी होण्यासाठी योग्य निर्णयक्षमता, जोखीम स्वीकारण्याची मानसिकता तसेच हिंमत ठेवली पाहिजे; त्याचबरोबर कुटुंबियांनीही त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे तरच उद्योग क्षेत्रातदेखील ठसा उमटेल, असे विचार केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. येणाऱ्या काळात नवीन संकल्पना, तंत्रज्ञान संशोधन, ज्ञान या गोष्टी महत्वाच्या असून त्यानुसार मराठी माणसाने आपले लक्ष केंद्रित करून उद्योग सुरू केले पाहिजेत, असेही ते म्हणाले.

‘जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’च्या २४ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दादरच्या शिवाजी मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते शिक्षणक्षेत्रात उल्लेख कार्य केल्याबद्दल शिक्षणमहर्षी डी. वाय. पाटील, सुषमा इलेक्ट्रीकल अँड मरीनचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश बेहरे, पॅम्स इंजिनिअरिम्ंगचे व्यवस्थापकीय संचालक मोहन राव आणि तेजस्विनी फुड्सच्या व्यवस्थापकीय संचालिका जयंती कथाळे यांना उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेंबरचे कार्याध्यक्ष खासदार शिवाजीराव आढळराव यांनी केले. यावेळी चेंबरचे संचालक प्रकाश चिखलीकर, सरचिटणीस प्रवीण शेटय़े, संचालक रवींद्र आवटी, सुरेश महाजन आदी उपस्थित होते.