रुपयाने सप्ताहाअखेरच्या व्यवहारात अमेरिकी डॉलरसमोर ६३ पर्यंत गटांगळी खाल्ली. शुक्रवारी दिवसअखेर रुपया ६२.९७ या दोन महिन्यांच्या तळात विसावला. गुरुवारच्या तुलनेत रुपया तब्बल ४७ पैशांनी रोडावला. चलन बाजारात रुपयाचा शुक्रवारचा प्रवास कमालीचा अस्वस्थ राहिला. सत्रात ६३ च्या खाली घसरत त्याने दिवसाचा तळ गाठला. ९ जानेवारी २०१५ नंतर पुन्हा ही पातळी गाठली गेली. त्यावेळी रुपया ६३.२० वर घसरला होता. ६२.४३ पर्यंत कसाबसा सावरणारा रुपया अखेर पाऊण टक्क्याने खालावलाच. सप्ताहअखेरही रुपया १.३० टक्क्यांनी कमकुवत बनला आहे. चलनाचा प्रवास आगामी कालावधीत ६३.५० पर्यंत जाऊ शकतो, अशी भीती व्हेरासिटी समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमित ब्रह्मभट्ट यांनी व्यक्त केली आहे, तर अमेरिकेतील वस्तूंच्या किरकोळ विक्री दरांवर डॉलरचा पुढील प्रतिसाद पाहणे उत्सुकतेचे ठरेल, असे इंडिया फॉरेक्सने आपल्या दैनिक अहवालात म्हटले आहे. अदमिसी फॉरेक्स इंडियाचे संचालक सुरेश नायर यांनी रिझव्‍‌र्ह बँकेने शुक्रवारी ८० कोटी डॉलरची खरेदी केल्याची शक्यता वर्तविली आहे.