डॉलरच्या तुलनेत सातत्याने घसरणारा रुपया आता थेट ६६ पर्यंत येऊन ठेपला आहे. परकी चलन विनियम व्यासपीठावर त्याला गुरुवारच्या तुलनेत २९ पैसे कमी भाव मिळाला. परिणामी ६५.८३ हा त्याने गेल्या दोन वर्षांचा तळ पुन्हा एकदा अनुभवला. चिनी अर्थव्यवस्थेवर घोंघावू लागलेल्या आर्थिक मंदीच्या सावटाने जागतिक स्तरावर भांडवली बाजारातील घसरणीच्या माध्यमातून चिंता व्यक्त केली जात असतानाच डॉलरच्या तुलनेत कमकुवत होत असलेल्या विशेषत: आशियाई चलनांची नवी धास्ती निर्माण झाली आहे.

यातून शुक्रवारी भारतीय चलनाने ६६ नजीकचा स्तर अनुभवला. ६५.६९ अशी तेजीची सुरुवात करणारा रुपया दुपारच्या व्यवहारात ६५.९१ पर्यंत घसरला. सत्रात ६५.६९ पर्यंत वर जाऊ शकणारे स्थानिक चलन अखेर ०.४४ टक्क्यांनी घसरले. ६ सप्टेंबर २०१३ समकक्ष रुपयाचे विद्यमान स्थान आहे. भांडवली बाजारात जवळपास एक टक्क्याची आपटी शुक्रवारी नोंदली गेली असताना चिनी युआनचे अवमूल्यन रुपयावर आणखी दबाव निर्माण करू शकते, असा अंदाज व्हेरासिटी ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमित ब्रह्मभट्ट यांनी व्यक्त केला आहे.