परकी विनिमय चलन व्यासपीठावर डॉलरच्या तुलनेत प्रामुख्याने आशियाई चलन अधिक कमकुवत होत असून रुपया पुन्हा ६४ च्या खाली गेला आहे. तर चीनचे युआन हे स्थानिक चलन अमेरिकी चलनापुढे तब्बल २ टक्क्य़ांनी घसरले आहे.
स्थानिक चलनाच्या ऱ्हासामुळे समस्त आशियाई देशांच्या निर्यातीबाबत चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे. आधीच मंदीसदृश स्थितीत प्रवास करणाऱ्या भारत, चीनसारख्या देशांना अमेरिकी चलनापोटी मोजावे लागणाऱ्या अधिकच्या रकमेमुळे निर्यात तसेच निर्मितीला फटका बसणार असल्याची धास्ती निर्माण झाली आहे.
ढासळत्या अर्थव्यवस्थेचा सामना करणाऱ्या चीनचा व्यापार प्रवासही खोलात जाऊ लागल्याने युआनही दशकातील मूल्यतळ अनुभवत आहे. व्यापार निर्यातीतील मोठय़ा घसरणीने चीनने युआनला स्वत:हून खालच्या तळाला आणले आहे.
या साऱ्याचा परिणाम भारतीय चलनावरही झालेला मंगळवारी दिसून आला. त्याचबरोबर भांडवली बाजारातही समभाग गुंतवणूकदारांनी निधी काढून घेण्याचा यत्न केला. परिणामी सेन्सेक्स व निफ्टीही जवळपास एक टक्क्य़ासह घसरले.
अमेरिका, युरोप हे निर्यातीसाठी प्रमुख बाजारपेठ असलेल्या भारत, चीन या देशांच्या निर्यातीवर विपरीत परिणाम होण्याची शंका जिओजित बीएनपी पारिबासच्या तांत्रिक संशोधन मंचाचे सहप्रमुख आनंद जेम्स यांनी व्यक्त केली आहे. रुपयातील आणखी घसरणीची शक्यता डेस्टीमनी सिक्युरिटीजचे अध्यक्ष सुदीप बंदोपाध्याय यांनी व्यक्त केली आहे.