डॉलरच्या तुलनेत सातत्याने घसरणाऱ्या रुपयाने सोमवारी त्याचा गेल्या दोन वर्षांतील तळ अनुभवला. सप्ताहारंभीच्या पहिल्या सत्रात स्थानिक चलन ३१ पैशांनी घसरत ६५.३१ वर येऊन ठेपले. ६५.१२ या किमान पातळीवर सुरू झालेल्या रुपयाचा सोमवारचा प्रवास सत्रात ६५.३६ पर्यंत खालच्या स्तरावर झाला. दिवसअखेर त्यात ०.४८ टक्क्य़ाची घसरण झाली.
भांडवली बाजारात सार्वजनिक क्षेत्रातील बँक समभागांमधील तेजी अमेरिकी चलनाची मागणी नोंदविणारी ठरली. सलग सात व्यवहारात घसरण नोंदविल्यानंतर रुपया शुक्रवारी १० पैशांनी वधारला होता. चलनाचे मूल्य गेल्याच आठवडय़ात ६५ या अनोख्या टप्प्यापर्यंत पोहोचले होते. चीनच्या युआन चलनाचे अवमूल्यन झाल्यानंतरचा भारतीय चलनावरील दबाव पुन्हा एकदा डोके वर काढू पाहत आहे.

डॉलर समोर रुपया गेल्या काही सत्रांपासून कमकुवत ठरत आहे. सोमवारच्या त्याच्या नरम प्रवासासाठी भांडवली बाजारातील घसरणीही कारणीभूत आहे. ६५ खालील रुपयाचा आगामी प्रवास ६५.८० पर्यंत घसरू शकतो. तर ते भक्कम बनल्यास ६४.८० च्या वर जाणार नाही.
– प्रमित ब्रह्मभट्ट,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
व्हेरासिटी ग्रुप.