नवी दिल्ली : देशातील वाहन विक्रीने गेल्या सहा महिन्यात तब्बल पाच महिन्यांमध्ये घसरण नोंदविली आहे. २०१८ च्या अखेरच्या महिन्यातही या क्षेत्रात घसरण अनुभवली गेली आहे.

‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्स’ (सिआम) ने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, डिसेंबर २०१८ मध्ये देशातील प्रवासी वाहन विक्री काही प्रमाणात कमी होत २,३८,६९२ पर्यंत झाली आहे. वर्षभरापूर्वी, डिसेंबर २०१७ मध्ये ती २,३९,७२३ होती.

एकूण प्रवासी वाहनांमध्ये देशांतर्गत कार विक्री २.०१ टक्क्य़ांनी घसरून १,५५,१५९ झाली आहे. डिसेंबर २०१७ मध्ये ती १,५८,३३८ होती.

गेल्या सहा महिन्यात ऑक्टोबर (+१.५५%) वगळता इतर सर्व पाच महिन्यात वाहन विक्री रोडावली होती. नोव्हेंबर २०१८ मध्ये वाहन विक्री ३.४३ टक्क्य़ांनी घसरली होती. तर जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये ती अनुक्रमे २.७१, २.४६ व ५.६१ टक्क्य़ांनी खाली आली होती.

गेल्या वर्षअखेर वाहन कंपन्यांकडून अनेक भरघोस सूट, सवलती देऊनही त्याचा फारसा परिणाम वाहन विक्री वाढण्यावर झाला नाही. जानेवारी २०१९ पासून अनेक कंपन्यांनी वाहनांच्या किंमती वाढविण्याचे जाहीर करूनही खरेदीदार नव्या वाहनांकडे वळलेच नाही. तसेच इंधनाच्या किंमती कमी होऊनही त्याचा लाभ वाहन विक्री वाढण्यावर झाला नाही.

वाहन क्षेत्राविषयक अनेक नव्या नियमांची अंमलबजावणी येत्या काही वर्षांमध्ये होणार असल्याने २०१९ मध्ये वाहन विक्री वाढण्याबाबतची आशा असल्याचे ‘सिआम’चे अध्यक्ष राजन वढेरा यांनी म्हटले आहे.

एकूण २०१८ या वर्षांमध्ये देशातील प्रवासी वाहन विक्री ५.०८ टक्क्य़ांनी वाढून ३३.९४ लाख झाली आहे.