रोकडरहित व्यवहारासाठी सॅमसंग इलेक्ट्रोनिक्सतर्फे सॅमसंग पे अशी मोफत सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेत क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड नोंदणी करून रोकडरहित व्यवहार करता येणार आहे.

सॅमसंग पे अ‍ॅपच्या माध्यमातून कोणत्याही ठिकाणी व्यवहार करताना मोबाईल स्क्रीनवरील नोंदणी केलेले क्रेडीट किंवा डेबिट कार्ड स्वाईप करुन पैसे भरता येणे शक्य होणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस ७ एड्ज, गॅलेक्सी एस ७, गॅलेक्सी नोट ५, गॅलेक्सी एस ६ एड्ज प्लस, गॅलेक्सी ए ५ (२०१६), गॅलेक्सी ए ७ (२०१६), गॅलेक्सी ए ७ (२०१६), गॅलेक्सी ए ५ (२०१७) आणि गॅलेक्सी ए ७ (२०१७) या मोबाईलमध्ये सध्या सॅमसंग पे उपलब्ध आहे. साऊथ कोरिया, चीन, स्पेन, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, रिको, ब्राझील, रशिया, थायलंड, मलेशिया या देशात देखील सॅमसंग पे अ‍ॅप उपलब्ध करण्यात आले आहे.

नाविन्याची कास धरत ग्राहकांना सोपी आणि उत्कृष्ट सेवा पुरवणारे सॅमसंग पे हे अ‍ॅप उदाहरण असल्याचे सांगण्यात आले, अशी प्रतिक्रिया सॅमसंग साऊथवेस्ट एशियाचे अध्यक्ष एच.सी.हाँग यांनी दिली. ग्राहकांना रोख व्यवहारासाठी सुरक्षित सेवा पुरवण्यात यावी यासाठी सॅमसंग पे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. सॅमसंग अ‍ॅपमुळे ग्राहकांना पूर्णत: डिजिटल वॉलेटचा वापर करता येणार असल्याने ग्राहकांचे रोखीचे व्यवहार सोपे होणार असल्याचे सॅमसंग पे चे महाव्यवस्थापक थॉमस को यांनी सांगितले.

सॅमसंग पे या अ‍ॅपमध्ये नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची योजना असलेल्या युपीआयच्या माध्यमातून रोख व्यवहार करणे शक्य होणार आहे. या सेवेला अ‍ॅक्सिस बँकेचे सहकार्य लाभले आहे. तसेच पेटीएम खाते देखील सॅमसंग पे या अ‍ॅपमध्ये सुरू  करण्याची सोय ग्राहकांना देण्यात आली आहे. सॅमसंग गिअर एस ३ या स्मार्टवॉचमध्ये देखील लवकरच सॅमसंग पे अ‍ॅप सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. बोटांच्या ठशांची ओळख आणि ग्राहकांच्या सहीच्या माध्यमातून ओळख पटवणारे सॅमसंग नॉक्सच्या सहाय्याने या अ‍ॅपची सुरक्षितता बाळगण्यात आली आहे.

टाटा कॅपिटलचे मायलोन अ‍ॅप

मुंबई : टाटा कॅपिटल या टाटा समूहाच्या आर्थिक सेवा पुरवणाऱ्या कंपनीने ‘मायलोन’ हे मोबाइल अ‍ॅप गुरुवारी मुंबईत सादर केले. कंपनीच्या या पहिव्यावहिल्या अनोख्या मोबाइल अ‍ॅपद्वारे ग्राहकांना वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. या अ‍ॅपद्वारे आपली कर्ज घेण्याची पात्रता किती आहे, हेही तपासण्याची सुविधा आहे. यानंतर मोबाइल फोनवरून कर्जासाठी अर्ज करता येईल. त्याचबरोबर या अ‍ॅपद्वारे विद्यमान ग्राहकांना आपल्या कर्जाची स्थिती आणि माहिती तपासता येईल.

ग्राहकाच्या कर्जासाठीच्या अर्जाचे निरसन नियोजित वेळेत करण्यासाठी ‘मायलोन’ अ‍ॅपमध्ये उच्च दर्जाची अत्याधुनिक अशी अल्गोरिदम सुविधा वापरण्यात आली आहे. टाटा कॅपिटलच्या ‘मायस्कोअर’मध्ये ग्राहकाला सोशल माध्यमातून प्रोफाइल समाविष्ट करता येणार असून त्याद्वारे संभाव्य पतपात्रता तपासता येणार आहे.

‘मायलोन’ अ‍ॅपद्वारे ग्राहकांना जास्तीत जास्त १५ लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज अवघ्या पाच मिनिटात उपलब्ध करून दिले जाणार आहे. ग्राहकांना कागदपत्रे या मोबाइल अ‍ॅपवर अपलोड करता येण्याचा पर्याय दिला आहे. मायलोन अ‍ॅप लवकरच आयओएस आवृत्तीतही सादर होईल.