सूचिबद्ध कंपन्यांच्या लेखा प्रमाणपत्रास दोन वर्षे मनाई

केवळ कागदावर आर्थिक ताळेबंद फुगवून तमाम कंपनी जगतात आठ वर्षांपूर्वी खळबळ उडवून दिलेल्या प्रवर्तक रामलिंगा राजूशी निगडित सत्यम प्रकरणात तत्कालिन लेखा परिक्षण कंपनी प्राईस वॉटरहाऊसकूपर्सवर (पीडबल्यूसी) सेबीने र्निबध लादले आहेत. यानुसार पीडब्ल्यूसीला येत्या दोन वर्षांसाठी लेखा परिक्षण प्रमाणपत्र जारी करता येणार नाहीत. या निर्णयाचा पीडब्ल्यूसीला धक्का बसला सेबीला आढळलेल्या तपासाबाबत आपण नाराज असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर वित्तीय सेवा समूह असलेल्या पीडब्ल्यूसीच्या भारतातील या लेखा परिक्षण संस्थेकडे भांडवली बाजारात सूचिबद्ध सत्यम कम्युटर्सच्या लेखा परिक्षणाची जबाबदारी होती. कंपनीचे संस्थापक व प्रवर्तक राजू यांनी बरोब्बर आठ वर्षांपर्वी कंपनीचा ताळेबंद चुकीचा असल्याची कबुली दिली होती. याबाबत भांडवली बाजार नियामक सेबीने केलेल्या तपासात लेखा परिक्षण कंपनीच्या दोन भागीदारांना अतिरिक्त लाभ झाल्याचा ठपकाही सेबीने ठेवला होता. याबाबत गुरुवारी सेबीने जारी केलेल्या १०८ पानी आदेशात लेखा परिक्षण कंपनीला आता पुढील दोन वर्षांसाठी लेखा परिक्षणासाठीचे प्रमाणपत्र जारी करता येणार नाही. पीडब्ल्यूसीबरोबरच चार अन्य लेखा परिक्षण कंपन्यांचीही सेबीने चौकशी केली होती.

भांडवली बाजारात सूचिबद्ध कोणत्याही कंपन्यांच्या लेखा परिक्षणाबाबतचे प्रमाणपत्र पीडब्ल्यूसीला पुढील दोन वर्षांकरिता देता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. लेखा परिक्षण कंपनीच्या दोन भागीदारांना अतिरिक्त रोखीने १३.०९ कोटी रुपयांचा लाभ झाला होता; ती व २००९ पासून वार्षिक १२ टक्के व्याज अशी रक्कमही लेखा परिक्षण संस्थेला जमा करण्यास सेबीने बजाविले आहे. पीडब्ल्यूसीच्या बंगळुरु कार्यालयाला यासाठी जबाबदार धरले आहे.