सलग आठ आठवड्यांमध्ये निरननिराळ्या कंपन्यांशी करार करण्यात आला असून रिलायन्स जिओमध्ये आतापर्यंत १.०४ लाख कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. दरम्यान, जिओमध्ये आणखी एक मोठी गुंतवणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सौदी अरेबियातील पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंड रिलायन्स जिओमध्ये १५० कोटी डॉलर्स म्हणजे तब्बल ११ हजार ३०० कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. या गुंतवणुकीद्वारे ते रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्ममध्ये २.३३ टक्के हिस्सा खरेदी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जर सौदी अरेबियाच्या पब्लिक इनव्हेस्टमेंट फंडनं जिओमध्ये गुंतवणूक केली तर जिओमध्ये परदेशी कंपन्यांचा हिस्सा २५ टक्के होणार आहे. गल्फ न्यूजंनं सूत्रांच्या हवाल्यानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. यापूर्वी रिलायन्स जिओनं ८ आठवड्यांमध्ये ९ कंपन्यांसोबत करार करून १.०४ लाख कोटी रूपयांमध्ये २२.२३ टक्के हिस्सा विकला आहे.

यापूर्वी २२ एप्रिल रोजी सर्वप्रथम फेसबुकच्या गुंतवणुकीपासून याची सुरूवात झाली. त्यानंतर एकूण ९ कंपन्यांसोबत १० डील करण्यात आल्या. या माध्यामातून रिलायन्स जिओनं १ लाख ४ हजार ३२६.९ कोटी रूपयांची जमवले आहेत. मागील आठवड्यात टीजीपी आणि एल कॅटरटॉनसोबत ६ हजार ४४१.३ कोटी रूपयांचा करार करत १.३२ टक्के हिस्स्याची विक्री केली. दरम्यान, मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रिजला कर्जमुक्त करण्यासाठी तसंच जिओला डिडिटल कंपन्यांच्या यादीत अग्रस्थानी नेण्यासाठी हे करार करत असल्याचं म्हटलं जात आहे.