भारतीय स्टेट बँकेच्या पाच सहयोगी बँकांमधील कर्मचाऱ्यांनी येत्या गुरुवारी ४ जूनला संपाची हाक दिली आहे. स्टेट बँकेत विलीनीकरणाला हा संप करून विरोध दर्शविला जाईल, तर याच महिन्यात २४ जूनला याच मागणीसाठी बँक कर्मचाऱ्यांच्या अन्य राष्ट्रीय संघटनांनीही बँकांच्या देशव्यापी संपाची हाक दिली आहे.

स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद आणि स्टेट बँक ऑफ पतियाला अशा स्टेट बँकेच्या सहयोगी बँका असून, या बँकांमधील सर्व कर्मचारी ४ जूनला संपावर जातील, असे त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अ. भा. बँक कर्मचारी महासंघ (एआयबीईए)चे उपाध्यक्ष विश्वास उटगी यांनी सांगितले. या बँकांना ‘एसबीआय अ‍ॅक्ट’च्या जोखडातून मुक्त करून, अन्य सार्वजनिक क्षेत्रातील बँकांप्रमाणे कारभार करू देण्याची मागणी वर्षांनुवर्षे कर्मचारी संघटनांकडून केली जात आहे. आज अत्यंत सुस्थितीत असलेल्या या बँकांना कवेत घेऊन, स्टेट बँक तिचा ताळेबंद सुधारू पाहत आहे. अशा बळजबरीच्या विलीनीकरणाला कर्मचाऱ्यांचा कसून विरोध राहील, असे उटगी यांनी स्पष्ट केले.