*  ९,००० कोटी रुपयांची उभारणी प्रस्तावित *  प्रति समभाग ७५० ते ७५५ रुपये किंमतीला बोली

मुंबई : देशातील सर्वात मोठी बँक- भारतीय स्टेट बँकेच्या क्रेडिट कार्ड व्यवसायाचे अंग असलेल्या ‘एसबीआय कार्ड्स अ‍ॅण्ड पेमेंट सव्‍‌र्हिसेस’ने प्रारंभिक खुल्या भागविक्रीतून ९,००० कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. येत्या २ मार्चपासून सुरू होणाऱ्या या भागविक्रीत ५ मार्चपर्यंत गुंतवणूकदारांना बोली लावता येईल.

एसबीआय कार्ड्सकडून या  भागविक्रीनिमित्त विक्रीला खुल्या होत असलेल्या १० रुपये दर्शनी मूल्याच्या १३.०५ कोटी समभागासाठी प्रत्येकी ७५० रुपये ते ७५५ रुपये या किंमत पट्टय़ात गुंतवणूकदारांना बोली लावता येईल.

एसबीआय कार्ड्समध्ये स्टेट बँकेचा ७६ टक्के भागभांडवली हिस्सा आहे, तर उर्वरित हिस्सा हा परदेशातील कार्लाइल समूहाकडे आहे. ऑक्टोबर १९९८ या कंपनीची सुरुवात स्टेट बँकेने जीई कॅपिटलशी भागीदारीतून केली होती. डिसेंबर २०१७ मध्ये जीई कॅपिटलचा कंपनीतील स्टेट बँक आणि कार्लाइल या विद्यमान भागीदारांकडून खरेदी करण्यात आला. प्रस्तावित भागविक्रीमार्फत दोन्ही भागीदार त्यांच्या कंपनीतील भागभांडवलाची अंशत: विक्री करणार आहेत, तर नव्याने जारी समभागांमार्फत कंपनी ५०० कोटी रुपयांचे भागभांडवल नव्याने उभारणार आहे.

भागविक्रीपश्चात समभागांची मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारात सूचिबद्धता केली जाणार आहे. कोटक महिंद्र कॅपिटल, अ‍ॅक्सिस कॅपिटल, डीएसपी मेरिल लिंच, नोमुरा फायनान्शियल अ‍ॅडव्हायजरी, एचएसबीसी सिक्युरिटीज आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स हे या भागविक्रीचे व्यवस्थापन पाहात आहेत.

स्टेट बँकेच्या भागधारक-कर्मचाऱ्यांना सवलत

देशातील दुसरी मोठी क्रेडिट कार्ड प्रदाती कंपनी आणि या बाजारपेठेत १८ टक्के हिस्सा असलेल्या एसबीआय कार्ड्सने १८ फेब्रुवारीला प्रारंभिक भागविक्रीसाठी अंतिम प्रस्ताव दाखल केला आहे. त्यामुळे या तारखेपर्यंत स्टेट बँकेचे भागधारक असणाऱ्यांना या भागविक्रीत प्रति समभाग १५ रुपयांची सवलत मिळणार आहे. स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांनाही या विक्री किमतीतील सवलतीचा लाभ मिळेल.

या भागविक्रीचे वैशिष्टय़ म्हणजे, ताज्या परंपरेप्रमाणे तीनऐवजी चार दिवस ही भागविक्रीची प्रक्रिया सुरू राहिल. ५ मार्च या अंतिम दिवशी केवळ वैयक्तिक छोटे गुंतवणूकदार, स्टेट बँकेचे भागधारक तसेच स्टेट बँक कर्मचाऱ्यांना अर्ज दाखल करून बोली लावता येणार आहे.