पाठोपाठ कर्जेही महागण्याचेही संकेत

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने पुन्हा एकदा मुदत ठेवींवर अधिक व्याज देऊ केले आहे. बँकेने महिनाभराच्या आत दुसऱ्यांदा मुदत ठेवींवरील व्याजदर वाढविले आहेत. अर्थात रिझव्‍‌र्ह बँकेचे व्याजदर निश्चितीची बैठक आठवडय़ावर असताना, घेतल्या गेलेल्या या निर्णयातून बँकेच्या कर्जावरील व्याजाचे दरही वाढण्याचा परिणाम क्रमप्राप्त दिसून येत आहे.

स्टेट बँकेने बुधवारी घेतलेल्या निर्णयात, दोन वर्षांहून अधिक मुदतीच्या गटातील ठेवींवरील व्याजदर पाव टक्क्यापर्यंत वाढविले आहेत. एक कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या मात्र दोन ते तीन वर्षांपर्यंतच्या मुदतीकरिता वार्षिक ६.६० टक्के व्याजदर लागू करण्यात आला आहे, तर तीन ते पाच वर्षे मुदतीकरिता ६.५० टक्क्यांऐवजी ६.७० टक्के व्याजदर मिळेल. पाच ते दहा वर्षे मुदतीच्या ठेवींवर ६.७५ टक्के व्याजदर असेल.

या व्यतिरिक्त एक टक्का अधिक व्याज हे स्टेट बँकेचे कर्मचारी तसेच बँकेच्या सेवानिवृत्तांना मिळेल. तसेच ज्येष्ठ नागरिकांना जाहीर नव्या व्याजदरांव्यतिरिक्त अर्धा टक्का अधिक व्याज मिळेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. एक वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवरील व्याजदर फेब्रुवारीमधील सुधारित व्याजदरांप्रमाणेच असतील. सध्या त्यावर वार्षिक ५.७५ ते ६.४० टक्के असे व्याजदर लागू आहे.

एक कोटी रुपये व त्यावरील रकमेवरही आता अधिक व्याज दिले जाणार आहे. एक ते दोन वर्षेकरिता अशा रकमेवर सध्याच्या ६.७५ टक्क्यांच्या तुलनेत आता ७ टक्के व्याज मिळेल. बँकेने गेल्या महिन्यात किरकोळ तसेच घाऊक मुदत ठेवींवरील व्याजदर अध्र्या टक्क्यापर्यंत वाढविले होते. रिझव्‍‌र्ह बँकेने तिच्या यापूर्वीच्या सलग तीन पतधोरणात व्याजदरात कोणताही बदल केला नाही. मध्यवर्ती बँकेचे आगामी पतधोरण येत्या ४ व ५ एप्रिल रोजी आहे.