तिजारिया पॉलीपाइप्स व त्या कंपनीच्या चार संचालकांना आयपीओमधील अनियमिततांमुळे भांडवली बाजारातून सात वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. भांडवली बाजाराचे नियमन करणाऱ्या सेबीने हा निर्णय घेतला आहे. याच प्रकरणी दोन संचालकांवर ३ वर्षांची बंदीही घालण्यात आली आहे. तसेच २० कोटी ४० लाख रुपयांचे आयपीओही मागे घ्यावेत, असे आदेश सेबीने दिले आहेत.
तिजारिया पॉलीपाइप्स आणि या कंपनीचे चार संचालक अलोक जैन तिजारिया, विकास जैन तिजारिया, विनीत जैन तिजारिया व प्रवीण जैन तिजारिया यांना कोणत्याही पद्धतीने सिक्युरिटी मार्केटमधून भांडवल उभे करण्यास मज्जाव करण्यात येत आहे, असे सिक्युरिटी अ‍ॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी)ने २० जून रोजी दिलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे. तसेच येती सात वर्षे भांडवली बाजारपेठेत कोणतेही व्यवहार करण्यास या सर्व संचालकांना मज्जाव करण्यात आला आहे.
त्याचबरोबर संतोषकुमार व पद्मप्रकाश सोमप्रकाश भटनागर या दोघा स्वतंत्र संचालकांवरही येत्या तीन वर्षांसाठी भांडवली बाजारपेठेत कोणतेही व्यवहार करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
तिजारिया पॉलीपाइप्समार्फत भांडवल उभे करून झाल्यानंतर २० कोटी ४० लाखांचे भांडवल ज्यांच्याकडे वळविण्यात आले होते, त्यांच्याकडून ते परत मिळविण्यासाठी योग्य व आवश्यक ती कठोर पावले तातडीने उचलावीत, असेही सेबीने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. यासाठी २० ऑगस्ट २०१४ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
आयपीओद्वारे भांडवलनिर्मिती ज्या कारणासाठी करण्यात आली त्यासाठी त्याचा वापर करण्याऐवजी तिजारिया पॉलीपाइप्सतर्फे खरेदी व्यवहार बघणाऱ्या व्यक्ती व संस्थांच्या खात्यात ती रक्कम वळती करण्यात आली, हे नियमांचे उल्लंघन असल्यामुळे सेबीने ही कडक पावले उचलली आहेत.