दशकभरापूर्वीच्या ‘इनसायडर ट्रेडिंग’ नियमांचे उल्लंघन आणि पर्यायाने फसवणुकीच्या कृत्याबद्दल, भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने राहुल, अतुल आणि संजय या किलरेस्कर बंधूंवर आणि किलरेस्कर इंडस्ट्रीज लिमिटेडशी संलग्न इतरांवर एकूम्ण ४२.७ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. भांडवली बाजारात तीन ते सहा महिन्यांच्या कालावधीसाठी त्यांना व्यवहार करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

किलरेस्कर इंडस्ट्रीज लिमिटेडची (केआयएल) निर्णायक मालकी ही अतुल आणि राहुल या धाकटय़ा बंधूंकडे आहे, तर किलरेस्कर ब्रदर्स लिमिटेड (केबीएल) ही संजय किलरेस्कर प्रवर्तित कंपनी आहे.

नियामकांनी मार्च २०१० ते एप्रिल २०११ या कालावधीतील केबीएलच्या समभागांमधील व्यवहारांची चौकशी करून हा दोषारोप निश्चित केला आहे. केबीएलच्या प्रवर्तक गटाने ६ ऑक्टोबर २०१० रोजी किलरेस्कर इंडस्ट्रीजला कंपनीतील २७५ कोटी रुपये मूल्याच्या १०.७२ दशलक्ष समभागांची विक्री केली. सप्टेंबर २०१० तिमाहीअखेर केबीएलची आर्थिक स्थिती सर्वच आघाडींवर बिघडलेली होती. या अप्रकाशित किंमत संवेदनशील माहितीच्या आधारे, भविष्यातील तोटा टाळण्यासाठी हा व्यवहार केला गेला, जे ‘इनसाइडर ट्रेडिंग’च्या आरोपाची पुष्टी करते, असे ‘सेबी’ने बुधवारी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. कंपनीच्या छोटय़ा भागधारकांना मारक या निर्णयाने या प्रवर्तकबाह्य़ भागधारकांचे नुकसान झाल्याचा ‘सेबी’चा आरोप आहे.

किलरेस्कर इंडस्ट्रीजला ५ लाखांचा दंड, अतुल व राहुल किलरेस्कर यांच्यासह सहा जणांना १४.६ कोटींच्या दंडाव्यतिरिक्त, नियमबाह्य़ व्यवहारांतून कमावलेल्या नफ्यापोटी १६.६ कोटी रुपये भरावे लागणार आहेत. त्याचबरोबर संजय किलरेस्कर आणि त्यांची पत्नी यांना दंड आणि नियमबाह्य़ कमावलेल्या नफ्यापोटी एकूण ४२.७ कोटी रुपये भरावे लागणार आहेत.