भांडवली बाजाराची महिन्याची वायदापूर्तीच्या व्यवहारांची अखेर गुरुवारी घसरणीने झाली. जागतिक निर्देशांकांतील पडझडीवर प्रतिक्रिया देताना येथील प्रमुख निर्देशांक सलग दुसऱ्या सत्रात खाली आले.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स बुधवारच्या तुलनेत १७२.६१ अंश घसरणीसह ३९,७४९.८५ पर्यंत स्थिरावला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५८.८० अंश घसरणीने ११,६७०.८० वर येऊन थांबला.

अनेक युरोपीय देशांमधील करोनाची साथ पुन्हा डोके वर काढत असून, तेथील टाळेबंदीतील विस्ताराचे पडसाद आशियाई भांडववली बाजारांवर उमटले, तर डॉलरच्या तुलनेत घसरता रुपया तसेच कंपन्यांच्या तिमाही वित्तीय निष्कर्षांवर प्रतिक्रिया देताना सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांक जवळपास अर्ध्या टक्क्य़ांनी घसरले.

‘लार्सन अँड टुब्रो’कडून घसरण दबाव

सप्टेंबर २०२० अखेर नफ्यातील ४५ टक्के घसरणीचे तिमाही वित्तीय निष्कर्ष बुधवार भांडवली बाजार व्यवहारानंतर जाहीर करणाऱ्या लार्सन अँड टुब्रोच्या समभाग मूल्यावरील विपरित परिणाम गुरुवारी सत्र सुरू होताच दिसून आला. व्यवहारात ५.७५ टक्के (रु. ९३५.२०) मूल्य गटांगळी खाणारा आघाडीच्या अभियांत्रिकी व पायाभूत सेवा कंपनीचा समभाग सत्रअखेर ४.९९ टक्के घसरणीसह ९३४.६० वर स्थिरावला. एकूण निर्देशांकांतील उतारालाही त्याने हातभार लावला.