भांडवली बाजारात सलग चौथी सत्रआपटी सप्ताहअखेर नोंदली गेली. एक टक्का निर्देशांक घसरणीने सेन्सेक्स व निफ्टीने त्यांचे प्रमुख स्तर शुक्रवारी सोडले.

गुरुवारच्या तुलनेत मुंबई निर्देशांक ४३४.९३ अंश घसरणीने ५०,८८९.७६ पर्यंत येऊन ठेपला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक १३७.२० अंश घसरणीमुळे १४,९८१.७५ पर्यंत स्थिरावला. बँक व वाहन क्षेत्रातील समभागांचा दबाव कायम राहिला.

चालू सप्ताहात सोमवार वगळता चारही व्यवहारांत प्रमुख निर्देशांकांनी घसरण नोंदविली आहे. या दरम्यान सेन्सेक्स ६५४.५४ अंशांनी कोसळला आहे, तर निफ्टी १८१.५५ अंशांनी खाली आला आहे. टक्केवारीत हे प्रमाण अनुक्रमे १.२६ व १.१९ टक्के आहे.

सेन्सेक्समध्ये शुक्रवारी ओएनजीसी सर्वाधिक, ५ टक्क्याने आपटला. तसेच स्टेट बँक, अ‍ॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज ऑटो, मारुती सुझुकी, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रही घसरले. तर इंडसइंड बँक, हिंदुस्थान यूनिलिव्हर, डॉ. रेड्डीज्, एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ट्रिज, बजाज फिनसव्‍‌र्ह आदी जवळपास दोन टक्क्यापर्यंत वाढले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये पोलाद, आरोग्यनिगा, वित्त २.५९ टक्क्यांपर्यंत घसरले, तर ऊर्जा निर्देशांक वाढला. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप मात्र १.६७ टक्क्यांपर्यंत घसरले.

पीएसयू बँक निर्देशांकांत तेजी कायम

सलग निर्देशांक घसरण होत असलेल्या प्रमुख भांडवली बाजारात मात्र सूचिबद्ध राष्ट्रीयीकृत बँकांचा निर्देशांक चालू सप्ताहात तेजी नोंदविणारा ठरला. दोन सरकारी बँकांच्या खासगीकरणाच्या अर्थसंकल्प दरम्यानच्या केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या घोषणेनंतर संभाव्य बँकांच्या नावाची चर्चा सुरू होताच संबंधित बँकांच्या समभाग मूल्यासह एकूण सार्वजनिक बँक निर्देशांकही वाढला. निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक महिन्याभरात ४४ टक्क्यांनी वाढला आहे. तर गेल्या तीन महिन्यांत त्यात ८० टक्के वाढ झाली आहे.