News Flash

‘सेन्सेक्स’ची दोन महिन्यांतील सर्वोत्तम उसळी

दोन्ही निर्देशांकात २ टक्क््यांची भर, गुंतवणूकदार ६ लाख कोटी रुपयांनी श्रीमंत

(संग्रहित छायाचित्र)

जागतिक भांडवली बाजारातील तेजी आणि देशातील कंपन्यांच्या चांगल्या वित्तीय कामगिरीच्या आशावादाने गुंतवणूकदारांनी नव्या सप्ताहारंभी जोरदार समभाग खरेदी केली. वित्त, माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा क्षेत्राला मागणीत प्राधान्य मिळाल्याने सेन्सेक्सने मंगळवारच्या व्यवहारात गत दोन महिन्यातील सर्वोत्तम निर्देशांक उसळी नोंदविली. परिणामी मुंबई निर्देशांक दोन आठवड्याच्या वरच्या टप्प्यावर स्थिरावला आहे.

मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकातही आठवड्याच्या पहिल्याच दिवशी २.३० टक्क्यांहून अधिक भर पडली. सेन्सेक्स १,१२८.०८ अंश झेप घेऊन  ५०,१३६.५८ वर पोहोचला. तर निफ्टी ३३७.८० अंश उसळीसह १४,८४५.१० पर्यंत स्थिरावला. गेल्या सलग दोन दिवसातील तेजीमुळे मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची मालमत्ता ६ लाख कोटी रुपयांनी झेपावली आहे.

सोमवारी धूलिवंदनानिमित्त भांडवली बाजार बंद होता. तत्पूर्वी शुक्रवारीही बाजारात तेजी नोंदविली गेली होती. सेन्सेक्समध्ये ५६८.३८ अंश वाढ झाली होती. मंगळवार सत्रअखेर मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार मूल्य २०४.७७ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. बाजारात मंगळवारच्या सत्रारंभापासूनच तेजी होती. व्यवहारात सेन्सेक्सने शुक्रवारच्या तुलनेत १,२५९.९५ अंश झेप घेत ५०,२६८.४५ अंशपर्यंत मजल मारली. सत्रअखेरही बाजारातील तेजी टिकून राहिली. १६ मार्चनंतर प्रथमच मुंबई निर्देशांक मंगळवार समकक्ष टप्प्यावर स्थिरावला आहे.

निफ्टीतील सत्रातील झेप ६ फेब्रुवारीनंतरची सर्वोत्तम ठरली. देशातील सर्वात मोठ्या भांडवली बाजाराच्या प्रमुख निर्देशांकातील ५० पैकी ४६ समभागांचे मूल्य वाढले. तर मुंबई शेअर बाजारातील सर्व क्षेत्रीय निर्देशांक वाढीच्या यादीत राहिले. त्यात माहिती तंत्रज्ञान, वित्त, पोलाद, आरोग्यनिगा निर्देशांक ३ टक्क्यांपर्यंत वाढले.

सेन्सेक्समध्ये बँक क्षेत्रातीलच एचडीएफसी बँकेचे मूल्य सर्वाधिक, ४ टक्क्याने वाढले. तसेच एचसीएल टेक, इन्फोसिस, एनटीपीसी आदीही वाढले. महिंद्र अँड महिंद्र, भारती एअरटेल, एक्सिस बँक सुरुवातीपासूनच घसरणीत राहिले. मिड कॅप व स्मॉल कॅप १.३० टक्क्यापर्यंत वाढले.

नजारा टेक्नॉलॉजीज्ची दमदार सूचिबद्धता

भांडवली बाजारातील सप्ताहारंभीची लक्षणीय तेजी नजारा टेक्नॉलॉजीज्च्या पथ्यावर पडली. मोबाइल गेमिंग क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने जारी केलेल्या प्रति समभाग १,१०१ रुपये मूल्याच्या तुलनेत थेट ७९ टक्के अधिक मूल्यासह बाजारात मंगळवारी पदार्पण केले. व्यवहारात थेट २,०२६.९० रुपयांपर्यंत मजल मारल्यानंतर कंपनी समभाग सत्रअखेर १,५७६.८० रुपयांवर स्थिरावला. कंपनीचे बाजार मूल्य ४,८०१.८० रुपये नोंदले गेले. आघाडीचे गुंतवणूकगुरू राकेश झुनझुनवाला यांचे अर्थपाठबळ लाभलेल्या कंपनीने गेल्या आठवड्यात ५८३ कोटी रुपयांची प्रारंभिक खुली भागविक्री प्रक्रिया राबविली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2021 12:16 am

Web Title: sensex best jump in two months abn 97
Next Stories
1 आवर्ती देयक व्यवहारांच्या स्वयंचलित नूतनीकरणावर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध
2 तिमाही निकालांवर नजर!
3 ‘एसआयपी’ मालमत्ता ४ लाख कोटींवर
Just Now!
X