सप्ताहअखेर ३३ हजाराचा पल्ला पार

शनिवारपासून सुरू होणाऱ्या गुजरात मतदान धुमाळीत सत्ताधारी भाजपाला यश मिळण्याचे निवडणूकपूर्व अंदाजावर स्वार होताना प्रमुख निर्देशांकांनी सप्ताहअखेरच्या व्यवहारातही तेजी नोंदविली. सलग दुसऱ्या सत्रात त्रिशतकी झेप घेताना मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने शुक्रवारी ३३ हजाराचा पल्ला सहज पार केला.

सेन्सेक्स व निफ्टी अशा दोन्ही निर्देशांकांमध्ये जवळपास एक टक्क्याची भर पडली.

३०१.०९ अंश वाढीसह सेन्सेक्स ३३,२५०.३० वर बंद झाला. तर ९८.९५ अंश भर नोंदविताना राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक १०,२६५.६५ पर्यंत स्थिरावला.

३३ हजाराच्या पुढेच आठवडय़ाच्या शेवटच्या व्यवहाराची सुरुवात केल्यानंतर मुंबई निर्देशांक सत्रात ३३,२८५.६८ पर्यंत पोहोचला. तर निफ्टीचा सर्वोच्च सत्रस्तर १०,२७०.८५ होता.

गुजरात विधानसभेच्या निवडणुकीचा पहिला टप्पा शनिवार, ९ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. तत्पूर्वी जाहीर झालेल्या निष्र्कषात सत्ताधारी भाजपला बहुमत मिळण्याचा कल दिसून आला. यामुळे भांडवली बाजारात उत्साही गुंतवणूकदारांनी सलग दुसऱ्या दिवशी समभागांची खरेदी केली. मुंबई निर्देशांकात गुरुवारी २५२.०३ अंश वाढ नोंदली गेली होती.

सेन्सेक्समध्ये आयटीसी सर्वाधिक, ३.४४ टक्क्यांनी वाढला. त्याचबरोबर टाटा मोटर्स, सन फार्मा, हिंदुस्थान यूनिलिव्हर, सिप्ला, ओएनजीसी, मारुती सुझुकी, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, अ‍ॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी लिमिटेड, टाटा स्टील आदी २.२१ टक्क्यांपर्यंत वाढले.

सेन्सेक्समधील मूल्य घसरलेल्या समभागांमध्ये हीरो मोटोकॉर्प, स्टेट बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, एशियन पेंट्स, डॉ. रेड्डीज् आदींचा समावेश राहिला. सर्व क्षेत्रीय निर्देशांक तेजीत होते. त्यातही पोलाद, आरोग्यनिगा, ग्राहकोपयोगी वस्तू, तेल व वायू, वाहन, बँक, स्थावर मालमत्ता आदी आघाडीवर राहिले. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप प्रत्येकी जवळपास एक टक्का वाढ नोंदविणारे निर्देशांक ठरले.

सप्ताहाअखेर आशियाई तसेच युरोपीय बाजारातही तेजीचे वातावरण होते. सप्ताह तुलनेत सेन्सेक्समध्ये ४१७.३६ अंश तर निफ्टी १४३.८५ अंश भर पडली आहे.