अर्थव्यवस्थेची लवकर फेरउभारी शक्य नसल्याच्या अमेरिकेची मध्यवर्ती बँक ‘फेडरल रिझव्‍‌र्ह’च्या अवलोकनाने नरमलेल्या जागतिक भांडवली बाजारांचे अनुसरण करीत, स्थानिक बाजारात सेन्सेक्सने गुरुवारच्या व्यवहारात त्रिशतकी घसरण नोंदविली.

डॉलरपुढे कमजोर बनलेला रुपया आणि खरेदीला अनुत्सुक बाजाराचा एकंदर मूड यामुळे सेन्सेक्स ३२३ अंशांच्या गटांगळीसह ३८,९७९.८५ या पातळीवर दिवसअखेरीस स्थिरावला. निफ्टी निर्देशांकही ८८.४५ अंश घसरणीसह ११,५१६.१० या पातळीवर बंद झाला. आधीच्या सलग दोन सत्रात निर्देशांकाने फेडरल रिझव्‍‌र्हकडून अमेरिकेतील रोखे खरेदी कार्यक्रम सुरू राहील, या आशेने चांगली वाढ नोंदविली होती. फेडनेही अपेक्षेप्रमाणे व्याजाचे दर हे २०२३ पर्यंत शून्यवत पातळीवर कायम ठेवण्यासह, मासिक रोख खरेदीही सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.