सलग तिसऱ्या सत्रात घसरताना मुंबई निर्देशांकाने बुधवारी त्याचा २४ हजारांचा स्तरही सोडला. एकाच व्यवहारातील अडीचशेहून अधिक अंश आपटीने सेन्सेक्स गेल्या २१ महिन्यांच्या तळात स्थिरावला.
२६२.०८ अंश घसरणीमुळे सेन्सेक्स २३,७५८.९० पर्यंत खाली आला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ८२.५० अंश घसरण झाली. प्रमुख निर्देशांक ७,२०० वर, ७,२१५.७० वर येऊन ठेपला.
भांडवली बाजाराची बुधवारची घसरण ही मंगळवारच्या प्रमाणातच राहिली. बुधवारच्या घसरणीने सेन्सेक्स १२ मे २०१४ मधील स्तरानजीक पोहोचला.
लुनार नववर्षांनिमित्ताने चीनमधील बाजार अद्यापही बंद आहेत. तर जपानच्या निक्केईतील घसरण बुधवारी २.३१ पर्यंत झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमुख निर्देशांकांचा दबाव येथे पुन्हा दिसून आला. त्यातही बँक, स्थावर मालमत्ता क्षेत्रातील समभागांची अधिक विक्री झाली.
मंगळवारी २४ हजारांच्या काठावर बंद झालेल्या मुंबई शेअर बाजाराची आठवडय़ाच्या तिसऱ्या सत्राची सुरुवात नरम झाली. सकाळच्या व्यवहारात मुंबई निर्देशांक २३,९३८.३२ वर होता. सातत्यातील घसरणीने तो २३,६३६.७२ पर्यंत खाली आला.
मंगळवारी ७,४०० चा स्तर सोडणाऱ्या राष्ट्रीय शेअर बाजार बुधवारी ७,३०० च्याही खाली आला. निफ्टीचा प्रवास ७,१७७.७५ पर्यंत खालच्या दिशने झाला.
सेन्सेक्समधील २३ समभागांचे मूल्य घसरले. यात टाटा मोटर्स, अदानी पोर्ट्स, सिप्ला, भेल, डॉ. रेड्डीज, ल्युपिन, ओएनजीसी, हीरो मोटोकॉर्प, आयटीसी हे आघाडीवर राहिले.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीला ७,२०० पुढील टप्पा राखण्यास आघाडीच्या समभागांनी हातभार लावला. एकूण निर्देशांक घसरूनही मूल्य वाढलेल्या समभागांमध्ये कोल इंडिया, एल अ‍ॅण्ड टी, मारुती सुझुकी, रिलायन्स इंडस्ट्रीज यांचा क्रम राहिला.
क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये बँक, सार्वजनिक उपक्रम, आरोग्य निगा, वाहन, तेल व वायू, ऊर्जा निर्देशांक ३.५० टक्क्यांपर्यंत घसरले.
मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांकांमध्ये अनुक्रमे १.४२ व ०.९५ टक्क्यांपर्यंत घसरण नोंदली गेली.