सेन्सेक्सची सहामाहीतील सुमार निर्देशांकसत्र आपटी

मुंबई : अमेरिका-इराणमधील युद्धसदृश स्थितीने भारतातील अर्थमापकही हेलावले असून आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी त्याचे विपरित पडसाद अनुभवले गेले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सप्ताहारंभीच्या एकाच सत्रात जवळपास ८०० अंश आपटीने गेल्या सहा महिन्यातील सुमार आपटी नोंदविणारा निर्देशांक ठरला.

एकटय़ा मुंबई शेअर बाजारातील सलग दोन दिवसांच्या घसरणीने येथील गुंतवणूकदारांच्या तब्बल ३ लाख कोटी रुपयांहून अधिक  मालमत्तेचा चुराडा झाला. सप्ताहारंभीच्या, सोमवारच्या व्यवहारातील जवळपास दोन टक्के निर्देशांक आपटीने मुंबई निर्देशांक त्याच्या ४१ हजारापासून तर निफ्टी निर्देशांक १२ हजारापासून फारकत घेणारा ठरला. सेन्सेक्स सोमवारच्या सत्रात एकूण ८५१ अंशांपर्यंत घसरला होता.

मुंबई निर्देशांकाने यापूर्वी, ८ जुलै सत्रातील सर्वात मोठी निर्देशांक आपटी नोंदविली होती. मुंबई शेअर बाजारातील सर्व क्षेत्रीय निर्देशांक सोमवारी घसरणीच्या यादीत राहिले. तर सेन्सेक्समध्ये टायटन कंपनी व पॉवरग्रिड हे दोनच समभाग तेजीच्या यादीत स्थिरावले. प्रमुख निर्देशांकाबरोबर मिड कॅप व स्मॉल कॅपही मोठय़ा प्रमाणात आपटले. गेल्या दोन दिवसातील ३.३६ लाख कोटी रुपयांच्या मालमत्ता घसरणीने मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य १५३.९० लाख कोटी रुपयांवर येऊन ठेपले.

इंधन दरभडका

अमेरिका-इराणमधील तणावपूर्ण वातावरणाने आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किंमती प्रति पिंप ७१ डॉलरनजीक गेल्या असून भारतातही परिणामी राजधानीत पेट्रेल व डिझेलच्या किंमती लिटरमागे दिवसात १७ पैशांपर्यंत वाढल्या. तर सार्वजनिक तेल व वायू कंपन्यांचे समभागमूल्य ७ टक्क्य़ांपर्यंत गडगडले.

रुपया ७२ च्या वेशीवर

जागतिक घडामोडीने अमेरिकी चलन भक्कम होत येथील परकीय चलन विनिमय मंचावर स्थानिक चलन सोमवारी ७२ च्या वेशीवर पोहोचले आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया आठवडय़ाच्या पहिल्याच व्यवहारात १३ पैशांनी आपटून ७१.९३ पर्यंत घसरले आहे. चलनात गेल्या सप्ताहअखेरही दुहेरी अंक घसरण झाली होती.

सोने ४१ हजारानजीक

खनिज तेल, रुपयासह मौल्यवान धातूच्या दरातही सोमवारी अनोखी घसरण नोंदली गेली. मुंबईच्या सराफा बाजारात स्टॅण्डर्ड सोन्याचे दर तोळ्यामागे एकदम ७५० रुपयांनी वाढून ४०,६८० रुपयांवर पोहोचले. तर राजधानीत त्याने १० ग्रॅमसाठी ४१,७३० चा टप्पा गाठताना सार्वकालिक उच्चांकी दर गाठला.