सोमवारची इतिहासातील सर्वात मोठी आपटी विस्मृतीत जाईल, अशी दमदार उभारी नंतरच्या सलग तीन सत्रांत भांडवली बाजार निर्देशांकांनी दाखविली. विद्यमान २०२० सालात सलग तीन दिवस बाजार निर्देशांकांनी सकारात्मक कल दाखविल्याचा हा पहिलाच प्रसंग असून, गुरुवारच्या व्यवहारात सेन्सेक्स ३० हजार अंशापुढेही मजल मारताना दिसला. तर निफ्टी निर्देशांकाचा ८,६०० पातळीच्या पुढे बंद स्तर नोंदविला.

करोना उद्रेकाला रोखण्यासाठी सुरू असलेल्या देशव्यापी टाळेबंदीने दगदग सोसत असलेल्या विविध घटकांसाठी बहुप्रतिक्षित असलेल्या आर्थिक उपाययोजनांची अर्थमंत्र्यांकडून घोषणेचे स्वागत बाजाराने वर्षांतील सर्वोत्तम सलग तेजीने केले. बाजारात व्यवहार सुरू असतानाच, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गरीब घटकांना दिलासा देणाऱ्या १.७० लाख कोटी रुपयांच्या अर्थप्रोत्साहक उपायांची घोषणा केली. बरोबरीने अमेरिकेत बुधवारी केल्या गेलेल्या तब्बल दोन लाख कोटी डॉलरच्या महाकाय योजनेचाही भांडवली बाजाराच्या गुरुवारच्या व्यवहारावर सकारात्मक परिणाम दिसून आला.

गुरुवारी महिन्याच्या सौदापूर्तीचे व्यवहार असतानाही, सेन्सेक्स १,४१०.९९ अंश वाढीसह ३० हजाराच्या वेशीवर म्हणजे २९,९४६.७७ पातळीवर तर निफ्टी ३२३.६० अंशांच्या उसळीसह ८,६४१.४५ या पातळीवर स्थिरावला. या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी अनुक्रमे ४.९४ टक्के आणि ३.८९ टक्के वाढ साधली.

उल्लेखनीय म्हणजे इतिहासातील सर्वात मोठय़ा घसरणीचा दणका सोमवारी बाजाराला बसला आहे. त्यानंतरच्या तीन व्यवहारात सेन्सेक्सने ३,९६५.३३ अंशांची (१५.२६ टक्के) कमाई केली आहे, तर निफ्टी निर्देशांकाने १,०३१.२० अंशांची (१३.५५ टक्के) भरपाई केली आहे.

अर्थात, देशव्यापी टाळेबंदीचा सर्वाधिक फटका बसलेल्या गरीब घटकांना मदत देणाऱ्या योजनेनंतर, या काळात मोठे आर्थिक नुकसान सोसत असलेल्या उद्योग क्षेत्रालाही दुसऱ्या टप्प्यात अर्थप्रोत्साहक पावले सरकारकडून टाकली जातील, अशी बाजाराची आशा बळावली आहे. भांडवली बाजारातील सकारात्मक खरेदीच्या वातावरणाचा फायदा परकीय चलन बाजारात गुरुवारी भारतीय चलनातील व्यवहारांनाही होताना दिसून आला. परिणामी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे विनिमय मूल्य तब्बल ७८ पैशांनी वाढून ७५.१६ अशी पातळी गाठताना दिसले. खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीतील घसरणही बाजाराच्या उत्साही वातावरणाच्या पथ्यावर पडली.