प्रमुख निर्देशांक पुन्हा एकदा तेजीच्या वाटेवर निघाले. नव्या आठवडय़ाची सुरुवात करताना सेन्सेक्ससह निफ्टी निर्देशांकात शुक्रवारच्या तुलनेत जवळपास अध्र्या टक्क्य़ाची भर पडली.

सोमवारच्या व्यवहारात ४४,२७१.१५ पर्यंत सार्वकालिक मजल मारल्यानंतर मुंबई निर्देशांक दिवसअखेर १९४.९० अंश वाढीसह ४४,०७७.१५ वर बंद झाला. तर ६७.४० अंशवाढीसह राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक १२,९२६.४५ पर्यंत स्थिरावला.

आंतरराष्ट्रीय स्तरावर करोना प्रतिबंधात्मक लशीबाबतच्या अस्तित्व दृष्टिक्षेपाने गुंतवणूकदारांना हायसे झाले आहे. परिणामी भांडवली बाजारात विदेशी गुंतवणूकदारांनीही त्यांना साथ देत निर्देशांकांना तेजी नोंदविण्यास भाग पाडले. असे असूनही सेन्सेक्स त्याच्या नव्या उच्चांकापासून काहीसा लांब, तर निफ्टी १३ हजारांच्या टप्प्यापासून काही अंतरावर राहिला.

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये सार्वजनिक क्षेत्रातील इंधन उत्पादक ओएनजीसी सर्वाधिक, जवळपास ७ टक्क्य़ांसह झेपावला. त्याचबरोबर खासगी क्षेत्रातील इंडसइंड बँक, बजाज फिनसव्‍‌र्ह, रिलायन्स इंडस्ट्रीजही वाढले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील इन्फोसिस, टेक महिंद्र, एचसीएल टेक, टीसीएसनाही मागणी राहिली. तर एचडीएफसी लिमिटेड, आयसीआयसीआय बंक, अ‍ॅक्सिस बँक, स्टेट बँक या बँक, वित्त क्षेत्रातील समभागांवर विक्री दबाव राहिला.

चालू सप्ताहात गुरुवारी महिन्यातील वायदापूर्तीचे अखेरचे व्यवहार होणार आहेत. तर दुसऱ्याच दिवशी, शुक्रवारी चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादनाबाबतची आकडेवारी जाहीर होणार आहे.

गैर बँकिंग वित्त कंपन्यांमध्ये मूल्यउसळी

देशातील मोठय़ा बिगर बँकिंग वित्त कंपन्यांचे व्यापारी बँकांमध्ये परिवर्तन करण्याबाबत रिझव्‍‌र्ह बँकेच्या समितीने शिफारस केल्यानंतर या क्षेत्रातील भांडवली बाजारात सूचिबद्ध कंपन्यांचे समभाग सोमवारी १८ टक्क्य़ांपर्यंत उसळले. व्यापारी बँकांमध्ये परिवर्तन होताना संबंधित कंपन्यांच्या प्रवर्तकांचा हिस्सा वाढविण्याबाबतची शिफारस पी. के. मोहांती समितीने केली आहे.

उज्जिवन फाय.  रु.२९४.६५   +१८.४३%

इक्विटास स्मॉल. रु.६३.४०    +१९.९६%

बजाज होल्डिंग्ज. रु.३,२४८.९५ +८.१५%

श्रीराम ट्रान्स.   रु.९७४.६०   +४.३२%

बजाज फाय. रु.४,८०९.६५ +१.९५%