केंद्रीय अर्थसंकल्प तसेच कंपन्यांचे तिमाही वित्तीय निष्कर्षांचे स्वागत करताना भांडवली बाजाराचे दोन्ही निर्देशांक गुरुवारी नव्याने विक्रमावर स्वार झाले. रिझव्‍‌र्ह बँकेच्या शुक्रवारच्या पतधोरणाची प्रतीक्षा करताना गुंतवणूकदारांनी आठवडय़ातील चौथ्या सत्रात बँक, वित्त समभागांची खरेदी केली.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सत्रात ५०,६८७.५१ पर्यंत झेपावल्यानंतर दिवसअखेर ३५८.५४ अंश वाढीसह ५०,६१४.२९ वर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १०५.७० अंश वाढीने १४,८९५.६५ पर्यंत थांबला. व्यवहारात तो १४,९१३.७० पर्यंत उंचावला होता. बुधवारच्या तुलनेत दोन्ही निर्देशांकांत जवळपास पाऊण टक्क्याची भर पडली.

सेन्सेक्समध्ये आयटीसी सर्वाधिक, ६.११ टक्क्यांसह वाढला. तसेच स्टेट बँक, बजाज फायनान्स, ओएनजीसी, महिंद्र अँड महिंद्र, कोटक महिंद्र बँक, बजाज फिनसव्‍‌र्ह, एनटीपीसी व अल्ट्राटेक सिमेंटही वाढले.

एशियन पेंट्स, इंडसइंड बँक, भारती एअरटेल, टेक महिंद्र, टायटन कंपनी, इन्फोसिस आदी २ टक्क्यांपर्यंत घसरले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ऊर्जा, पोलाद, बँक, भांडवली वस्तू, तेल व वायू, उद्योग २.५६ टक्क्यांपर्यंत वाढले. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप १.४५ टक्क्यांनी उंचावले.

बाजार भांडवल प्रथमच २०० लाख कोटींवर

देशातील सर्वात जुन्या भांडवली बाजाराचे बाजार भांडवल गुरुवारी विक्रमी अशा २०० लाख कोटी रुपयांवर पोहोचले. चार दिवसांत गुंतवणूकदारांची संपत्ती १४.३४ लाख कोटी रुपयांनी वाढली. मुंबई निर्देशांकाच्या ऐतिहासिक कामगिरीच्या जोरावर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल गुरुवारअखेर २००,४७,१९१.३१ कोटी रुपयांवर पोहोचले. सेन्सेक्समध्ये गेल्या सलग चार व्यवहारांत मिळून ४,३२८.५२ अंशांची, ९.३५ टक्क्यांची भर पडली आहे. मुंबई शेअर बाजाराचे बाजार भांडवल २८ नोव्हेंबर २०१४ला प्रथमच १०० लाख कोटी रुपयांवर पोहोचले होते. नववर्षांरंभापासून सेन्सेक्स सत्रात दोन वेळा ५० हजारांपर्यंत पोहोचला होता.