भांडवली बाजार निर्देशांकांनी सप्ताहअखेर संमिश्र हालचाल नोंदविली. सेन्सेक्स ११.५८ अंश घसरणीसह २४,६७३.८४ पर्यंत आला, तर ८.७५ अंशवाढीसह निफ्टी ७,५५५.२० वर पोहोचला.
सप्ताहात सेन्सेक्स व निफ्टीत दोन टक्क्य़ांहून अधिक घट नोंदली गेली आहे. दोन्ही निर्देशांकांनी सलग दुसरा साप्ताहिक नकारात्मक प्रवास नोंदविला आहे. संपूर्ण आठवडय़ात सेन्सेक्समध्ये ५९५.८० अंश, तर निफ्टीत १५७.८५ अंश आपटी नोंदली गेली आहे.
जपानच्या येन चलनातील भक्कमता आणि मार्चमधील वाहनविक्रीतील घसरण यामुळे बाजारातील सूचिबद्ध मारुती सुझुकीचा समभाग १.२२ टक्क्य़ांनी घसरला, तर २०१५-१६ आर्थिक वर्षांत १७,५१६ कोटी रुपयांची कंत्राटे मिळविणाऱ्या एनबीसीसीचा समभाग १.२६ टक्क्य़ांसह वाढला.
सेन्सेक्स व्यवहारात २४,६०८.५१ पर्यंत घसरला होता, तर निफ्टी सत्रात ७,५६९ पर्यंत उंचावला. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील टाटा समूहातील टीसीएस १.७१ टक्क्य़ांसह सर्वाधिक समभाग मूल्य घसरण नोंदविणारा ठरला.