11 August 2020

News Flash

दणदणीत आपटी

गेल्या जवळपास अडीच महिन्यांतील सर्वात मोठय़ा घसरगुंडीची कामगिरी बजावत, भांडवली बाजाराने मंगळवारी गुंतवणूकदारांचा खिसा तब्बल दीड लाख कोटी रुपयांनी रिता केला.

| September 24, 2014 12:09 pm

गेल्या जवळपास अडीच महिन्यांतील सर्वात मोठय़ा घसरगुंडीची कामगिरी बजावत, भांडवली बाजाराने मंगळवारी गुंतवणूकदारांचा खिसा तब्बल दीड लाख कोटी रुपयांनी रिता केला. आंतरराष्ट्रीय बाजाराती प्रतिकूलतेवर प्रतिक्रिया देत येथे सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांक प्रत्येकी दीड टक्क्य़ांनी आपटले. ४३१.०५ अंश घसरणीसह सेन्सेक्स २७ हजारांची पातळी सोडत, २६,७७५.६९ वर आला, तर १२८.७५ अंश गंटांगळीने निफ्टी ८,०१७.५५ वर स्थिरावला. दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी ८ जुलैनंतरची सर्वात मोठी आपटी  मंगळवारी नोंदविली.
मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांपैकी २,१०० हून अधिक कंपन्यांचे समभाग मूल्य रोडावल्याने एकाच व्यवहारात गुंतवणूकदारांची १.६० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक मूल्य लयाला गेले. महिन्यातील वायदापूर्ती सौद्यांना एक दिवस शिल्लक असताना वरच्या टप्प्यावर पोहोचलेल्या बाजारातील समभागांची विक्री करून सट्टेबाजांनी लाभ पदरात पाडून घेतला.
मुंबई शेअर बाजारातील सर्व डझनभर क्षेत्रीय निर्देशांक उतरणीला आले. त्यांच्यातील घसरण ४.९१ टक्क्यांपर्यंतची होती. बांधकाम, तेल व वायू, भांडवली वस्तू, पोलाद, औषध निर्मिती हे घसरणीत पुढे होते. सिप्ला, टाटा मोटर्स, हिंदाल्को, टाटा स्टील हे घसरले. तर हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसी, मारुती सुझुकी, एनटीपीसी या समभागांचे मूल्य उंचावले. गेल्या काही सत्रांपासून गतिमान असलेले मिड व स्मॉल कॅपही या घसरणीत अनुक्रमे २.४८ व १.९१ टक्के नकारात्मक कामगिरी बजाविणारे ठरले.
दिवसाच्या २७,२५६.८७ या उच्चांकाला असलेला मुंबई निर्देशांक अखेरच्या क्षणापूर्वी २६,७४४.०७ या सत्रातील किमान स्तरावरही आला. दिवसअखेर त्यात सोमवारच्या तुलनेत ४०० हून अधिक अंशांची घसरण नोंदली गेली. सेन्सेक्सने यापूर्वी ८ जुलै रोजी एकाच व्यवहारात सर्वाधिक अशी ५१७.९७ अंश घसरण नोंदविली आहे. तर निफ्टीनेही याच दिवशी १६४ अंश आपटी राखली आहे.
सेन्सेक्समधील तब्बल २६ कंपनी समभागांचे मूल्य रोडावले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये सर्वाधिक, ४.९१ टक्क्यांच्या घसरणीचा फटका बांधकाम क्षेत्राला बसला. यूनिटेकचा समभाग १०.७७ तर डीएलएफचा ६.५१ टक्क्यांनी घसरला. एकाच दिवसातील १.६५ लाख कोटी रुपयांच्या नुकसानामुळे मुंबई शेअर बाजाराचे बाजार भांडवल ९४.४३ लाख कोटी रुपयांवर येऊन ठेपले. सेन्सेक्सच्या दफ्तरी २,१८२ कंपनी समभाग घसरले. तर ८४७ समभागांचे मूल्य वधारले.
घसरणीच्या वादळात ‘शारदा’चे दमदार पदार्पण
बाजारात सेन्सेक्सची चार शतकी घसरगुंडीचा धुरळा उडत असताना, गेल्या आठवडय़ात यशस्वी भागविक्री करणाऱ्या शारदा क्रॉपकेमच्या समभागांचे बाजारात आज दमदार पहिले पाऊल उमटले. भागविक्रीपश्चात प्रत्येकी १५६ रुपये दराने वितरीत झालेल्या समभागांचा बीएसईवर पहिला सौदा ६२.८८ टक्के मुसंडीसह २५४.१० रुपयांनी झाला, तर दिवसाच्या व्यवहारात त्याच्या भावात ७५.५४ टक्क्य़ांपर्यंत उफाण दिसून आले. मंगळवारअखेर ४८.३६ टक्के वाढीसह शारदाच्या समभागाने २३१.४५ रुपयांवर विश्राम घेतला.
१२ पैशांनी रोडावून रुपया सप्ताहाच्या नीचांकावर
मुंबई: सोमवारच्या तुलनेत आणखी १२ पैशांनी रोडावत रुपयाने मंगळवारी आठवडय़ातील नीचांक दाखविला. डॉलरसमोर स्थानिक चलन मंगळवारच्या व्यवहारात ६१ च्या तळात गेले होते. मात्र दिवसअखेर ते सुधारून ६०.९४ वर स्थिरावले. सोमवारी रुपया अवघ्या एका पैशाने घसरत ६०.८२ वर थांबला होता. मंगळवारी त्याचा प्रवास ६०.९३ या स्तरावरूनच सुरू झाला. लगेच तो ६१ च्या तळातही जाऊन बसला. रुपया आता १६ सप्टेंबरनंतरच्या किमान स्तरावर पोहोचला आहे.
सोने-चांदी दरात सुधार
मुंबई : देशाच्या आर्थिक राजधानीत मौल्यवान धातूंच्या दरांमध्ये मंगळवारी सुधार पाहायला मिळाला. स्टॅण्डर्ड प्रकारचे सोन्याचे दर ४१५ रुपयांनी उंचावत तोळ्यामागे २६,८१५ रुपयापर्यंत गेले, तर चांदीच्या किलोच्या दरानेही पुन्हा ४० हजार रुपयांवरील प्रवास नोंदविला. एकाच व्यवहारात ५९० रुपयांची वाढ होत पांढरा धातू ४०,२७० रुपयांवर स्थिरावला. सोने, चांदीच्या दरांमध्ये सप्ताहारंभी मोठी घसरण अनुभवली गेली. परिणामी, सोने २६,५०० च्या तर चांदी ४० हजारांच्याही खाली उतरली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2014 12:09 pm

Web Title: sensex nifty fall most in 10 weeks rs1 5 trillion investor wealth wiped out
टॅग Bse,Nifty,Sensex
Next Stories
1 औषधांवरील किंमत नियंत्रण आदेश मागे
2 सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या भावातील घट उद्योगाच्या जिव्हारी
3 ‘आरसीएफ’चे इराणमध्ये खत प्रकल्पाचे नियोजन
Just Now!
X