मुंबई : भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकांनी शुक्रवारी पुन्हा एकदा सर्वोच्च ऐतिहासिक पातळीला स्पर्श केला. मात्र ही उसळी दुपारच्या सत्रात झालेल्या नफावसुलीमुळे अल्पजीवी ठरली. परिणामी सेन्सेक्स आणि निफ्टीला घसरणीचे ग्रहण लागले.

सेन्सेक्समध्ये सर्वाधिक योगदान असणारा रिलायन्सचा समभाग आणि माहिती तंत्रज्ञान व धातू कंपन्यांच्या समभागांमध्ये झालेल्या नफावसुलीमुळे सेन्सेक्सने त्याच्या ऐतिहासिक उच्चांकी पातळीपासून घसरत नकारात्मक पातळीत प्रवेश केला. सेन्सेक्स सकाळच्या सत्रात ६०० अंशांनी वधारला होता. मात्र दिवसअखेर १२५.२७ अंशांच्या घसरणीसह तो ५९,०१५.८९ पातळीवर बंद झाला. सेन्सेक्सने शुक्रवारी दिवसभरात ५९,७३७.३२ अंशांच्या सर्वोच्च पातळीला स्पर्श केला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ४४.३५ अंश गमावत १७,५८५.१५ पातळीवर स्थिरावला. निफ्टीने देखील सकाळच्या सत्रात आलेल्या तेजीमुळे १७,७९२.९५ अंशांची सर्वोच्च पातळी गाठली होती.