निफ्टीची विक्रम परंपरा कायम; निर्देशांकांची तेजीचाल

मुंबई : सलग चौथ्या व्यवहारातील तेजीमुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सप्ताहारंभीच ५२ हजारानजीक पोहोचला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीची विक्रम परंपराही कायम राहिली. दोन्ही प्रमुख निर्देशांकातील सत्रवाढ जवळपास एक टक्का राहिला.

मुंबई निर्देशांक ५१४.५६ अंशवाढीने ५१,९३७.४४ पर्यंत झेपावला. त्याच्या विक्रमी टप्प्यापासून तो आता अवघ्या २०० अंश दूर आहे. सेन्सेक्सचा ऐतिहासिक उच्चांक ५२ हजारांपुढे, १५ फेब्रुवारीला होता.

निफ्टी निर्देशांकात सलग सातवी वाढ नोंदली गेली. परिणामी शुक्रवारचा त्याचा वरचा टप्पा सोमवारी मागे पडला. १४७.१५ अंशवाढीसह निफ्टी पहिल्यांदाच १५,५८२.८० पर्यंत पोहोचला. निर्देशांकाने गेल्या आठवडय़ात विक्रमी स्तर गाठला होता.

करोनाबाधितांची संख्या कमी होत असताना टाळेबंदीचे निर्बंधही शिथिल होत असल्याने गुंतवणूकदारांचा भांडवली बाजारातील समभाग खरेदी उत्साह अधिक वाढला आहे. जागतिक बाजारातील तेजीचाही परिणाम येथे दिसून आला.

सेन्सेक्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रिज, एचडीएफसी बँक व एचडीएफसी लिमिटेड, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, डॉ. रेड्डीज्, मारुती सुझुकी, आयटीसी, एनटीपीसी, अ‍ॅक्सिस बँक आदी वाढले.

तेजीच्या बाजारात मात्र महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, इन्फोसिस, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, इंडसइंड बँक, टेक महिंद्र, सन फार्मा आदी तब्बल ४.५० टक्क्यांपर्यंत घसरले. भांडवली बाजार व्यवहारानंतर स्पष्ट झालेल्या विकास दराबाबतची प्रतिक्रिया बाजारात उमटली.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वाहन व माहिती तंत्रज्ञान निर्देशांक वगळता इतर सर्व तेजीच्या यादीत राहिले. त्यातही ऊर्जा, पोलाद, दूरसंचार, तेल व वायू निर्देशांकातील वाढ २ टक्क्यांपर्यंतची राहिली.

मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप जवळपास प्रत्येकी अर्ध्या टक्क्यापर्यंत वाढले.

सेन्सेक्सने गेल्या दोनच व्यवहारांत १,००० अंश भर नोंदवली आहे, तर रिलायन्स गेल्या चार दिवसांत १० टक्क्यांनी वाढला आहे.

गेल्या आठवडय़ात मुंबई निर्देशांकाने ८८२.४० अंशांची भर नोंदवली. तर निफ्टी या दरम्यान २६०.३५ अंशांनी वाढला.

गुंतवणूकदार ४ लाख कोटींनी श्रीमंत

सेन्सेक्सच्या रूपात गेल्या सलग चार व्यवहारांत तेजी नोंदविणाऱ्या मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची संपत्ती ३.९३ लाख कोटी रुपयांनी वाढली आहे. भांडवली बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार मूल्य २२२.९९ लाख कोटी रुपये झाले.